
कोरोनामुळे व्यवसाय झाले ठप्प! व्यावसायिक झाले बेजार!
गेले काही महिन्यांपासून सुरू झालेला कोरानाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस बंद असलेली दुकाने उघडण्यास राज्य शासनाने काही प्रमाणात परवानगी दिली असली तरी अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक फिरकत नसल्याचे सध्या चित्र आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने बँकांना हप्ते भरण्याबाबत व घरमालकांना भाडे देण्याबाबत मुदत द्यावी अशी सूचना केली होती. अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने भाड्याने देवून व्यवसाय सुरू केला होता. परंतु गेले दोन ते अडीच महिने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे मालकांचे दुकानाचे भाडे द्यावयाचे कसे? असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. अनेक दुकानांचे मालक व घरांचे मालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत. बँकाही अनेक कर्जदारांना बँकेचे हप्ते भरण्याबाबत वारंवार फोन करून हप्ते भरण्याबाबत दबाव आणत आहेत. मागील दोन महिन्यांपासून उत्पन्न नसल्याने आता भाडे व हप्ते कसे भरावयाचे असा मोठा प्रश्न अनेक व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत सर्व व्यवसायांवर परिणाम झाल्याने बँकांनी व दुकान व घरमालकांनी सामंजस्याची भूमिका घेवून मार्ग काढावा अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.
www.konkantoday.com