
सामाजिक न्याय भवन येथे आता नवे कोरोना रूग्णालय -आरोग्य विभागाचा निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाखाच्यावर चाकरमानी आले असून मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शासकीय रूग्णालय हे कोरोना रूग्णालय करण्यात आले असून तेथे अंदाजे ४०० बेडची सुविधा आहे. मात्र येत्या काही दिवसात रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून नव्या कोविड रूग्णालयाची स्थापना करण्याचे निश्चित झाले आहे. त्याप्रमाणे हे रूग्णालय आता कुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे उभारण्याचे ठरवण्यात आले असून नुकतीच जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांच्या टीमने तेथे पाहणी केली. या नव्या कोविड रूग्णालयासाठी चार वैद्यकीय अधिकारी व नर्सेसची नेमणूक करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्याची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील परंतु त्यांना कसलेही लक्षण दिसत नाही तसेच त्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रूग्णांना या नवीन कोविड रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com