
कोकणात नमन महोत्सवास शासनाकडून ३५.४७ लाखाचे अनुदान.
कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा यापूर्वीच लोककला या प्रकारात समावेश करण्यात आल्यानंतर आता भरवण्यात येणार्या नमन महोत्सवासाठी शासनाकडून ३५ लाख ४७ हजार रुपयांचे अनुदानही जाहीर केले आहे. या बाबतचा प्रशासकीय मंजुरीचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे याप्रश्नी पाठपुरावा करत असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर यानिमित्त कोकणातील नमन मंडळे व कलावंत यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकणात नमन या कलेला फार मोठे महत्व आहे. कोकणात अनेक नमन मंडळे असून त्या माध्यमातून अनेक कलाकारही कोकणात तयार होत आहेत. विशेष म्हणजे कोकणात ही कला पिढ्यानपिढ्या कायम असून त्याची लोकप्रियताही कायम आहे. परंतु या नमन मंडळांना तसेच कलावंतांना राजाश्रय नसल्याने आर्थिक अडचणींबरोबरच समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी कोकणातील ही कला लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली होती.
अशातच सावंत यांनी याची दखल घेत कोकणातील सर्वात पहिला नमन महोत्सव सावर्डे येथे आयोजित केला होता. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी या कलेला राजाश्रय मिळावा, यासाठी सावंत यांनी प्रयत्न सुरू केले. अगदी मंत्रालयापर्यंत त्यांनी लगेच पाठपुरावा केला होता.www.konkantoday.com