रत्नागिरी शहरातील पावसापूर्वीच्या कामांबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी घेतला आढावा, नाले सफाई व डास फवारणीकडे लक्ष, दोन स्वतंत्र टीम तैनात करणार
रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी येणार्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. पावसापूर्वीच्या तयारीसाठी पालिका आता सज्ज झाली आहे. अतिवृष्टीमुळे व वादळामुळे झाडे, फांद्या तुटल्या तर त्या हटविण्यासाठी दोन टीम नगर परिषदेने तयार केल्या आहेत. त्यातील एक टीम दिवसा तर एक टीम रात्री असे काम करणार आहे. या बैठकीला उपनगराध्यक्ष रोशन फाळके, आरोग्य सभापती राजन शेट्ये, पाणी सभापती विकास पाटील, नगरसेवक बंटी कीर, निमेश नायर आदीजण उपस्थित होते. या बैठकीत पावसापूर्वीच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. पावसापूर्वीच शहरातील नाल्यांची पावसापूर्वी साफसफाई केली आहे असे साळवी यांनी सांगितले. शहरातील स्वच्छतेबाबतही दक्ष राहण्यास त्यांनी सांगितले. तसेच साथींचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून वेळोवेळी नियोजन करण्यात येत आहे तसेच शहरात पाणी भरू नये यासाठी नगरपालिका लक्ष ठेवणार आहे.
www.konkantoday.com