
तुमच्या आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या एसटीचा आज ७२ वा वाढदिवस
महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटीने आज ७२वर्ष पूर्ण केले आहेत. तुमच्या आमच्या सुख -दुःखाला धावून येणाऱ्या एसटीचा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा होणार नसल्यानं याबाबतची खंत एसटी कर्मचारी, प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
तिला कुणी एसटी म्हणतं. कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं. कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवन वाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या शहरी भाग ते ग्रामीण भाग तसेच महानगर पर्यंत जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. शहरी भाग, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात आजही लोक एसटी वाट पाहत थांबलेल दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना विश्वासाचा आधार आहे फक्त एसटीचाच.एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास.असा नारा सरकारने दिला किंबहुना तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलंमहाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता १ जून १९४८. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती. ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.
www.konkantoday.com