राजापूर तालुक्यातील हातदे आणि मूर येथील बंद असलेली आरोग्य उपकेंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी
करोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता राजापूर तालुक्यातील हातदे आणि मूर येथील बंद असलेली आरोग्य उपकेंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी त्या गावांमधील चाकरमान्यांच्या वतीने एकनाथ महादेव नार्वेकर यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे.
जे लोक मुंबईतून गावी पोहोचले आहेत, त्यांना १४ ते २८ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. त्यानुसार अनेकांची विलगीकरणाची मुदत संपत आली आहे. त्यांना नंतर त्यांच्या घरी जायचे आहे. मात्र घरी पाठविण्यापूर्वी ते करोनामुक्त आहेत, याची चाचणी घेणे आवश्यक आहे.या साऱ्या पार्श्वभूमीवर हातदे आणि मूर येथे असलेली आरोग्य उपकेंद्रे चालू करावीत. तसेच तेथे पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी. म्हणजे चाकरमान्यांची चांगली सोय होऊ शकेल. आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी व्हायला मदत होणार आहे, असे श्री. नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
www.konkantoday.com