जिवाची तमा न बाळगता रूग्णवाहिकेवर काम करणारे कोविड योध्दा चालक तीन महिने पगाराविना

दापोली तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना जिवाची तमा न बाळगता रूग्णवाहिकेवर काम करणारे कोविड योध्दा चालक तीन महिने पगार न मिळाल्याने आमचा पगार कधी मिळणार या विवंचनेत आहेत.
रत्नागिरी जिल्हयात ६७प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये असलेल्या रूग्णवाहिकांवर ६७ चालक कंत्राटी पध्दतीवर काम करत असून गेले ३ महिने कंत्राटदाराने त्यांचा पगारच दिलेला नाही. त्यामुळे खायचे काय व कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.
मार्चपासून संपूर्ण जिल्हयात कोरोनाचा प्रभाव वाढत असून मुंबईतून प्रवासाची हिस्ट्री असलेले कोरोनाबाधित रूग्ण मिळू लागले असून जिल्हयातील कोरोनाबाधित रूग्णांनी १७५ आकडा मागे टाकला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाचा मोठा वाटा असून खेडोपाडयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिकेवर कंत्राटी पध्दतीने घेतलेले हे चालक गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत रात्रंदिवस काम करत असून अनेक दिवस ते घरीही गेलेले नाहीत. शासकीय कर्मचार्यांचा दर्जा त्यांना नसल्याने त्यांना विम्याचेही कवच नाही. तरीही ते कोणताही खंड न पडता रूग्णवाहिकेवर काम करत आहेत.
गावातून अनेकवेळा कोरोनाचे संशयित रूग्ण रूग्णवाहिकेतून आणावे लागत असल्याने या चालकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. किमान वेळेवर
पगार तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात आलेल्या आ.योगेश कदम यांची या कंत्राटी चालकांनी भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तीन महिन्यांचा रखडलेला पगार मिळवून द्यावा, अशी विनंती कदम यांच्याकडे केली आहे. आ.कदम यांनी त्यांना पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button