- कोकण मार्गावरून धावणार्या मांडवी एक्स्प्रेससह सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत १ फेब्रुवारीपासून बदल करण्यात येणार आहेत. या दोन्ही एक्स्प्रेसचे २ स्लीपरचे डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर वातानुकुलीत डबे जोडण्यात येणार आहेत. या नव्या कायमस्वरूपी बदलाचा कोकणातील सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. स्लीपर श्रेणीचे तिकिट मिळणे आता कठीण होणार असून प्रवाशांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.कोकण मार्गावरून नियमितपणे धावणारी व कोकणवासियांच्या हक्काची मांडवी एक्सप्रेस नेहमीच खचाखच गर्दीने धावत असते. सण-उत्सव कालावधीत दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवाशांना अक्षरशः रेटारेटीचाच प्रवास करावा लागतो. मात्र, तरीही कोकणवासियांची दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना भरभरून पसंती मिळत आहे. रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यातही दोन्ही एक्सप्रेस सरसच ठरल्या आहेत.कोकण मार्गावरून धावणार्या १०१०३/१०१०४ क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस व २०१११/२०११२ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचे २ स्लीपरचे डबे कमी करून त्या ऐवजी २ इकॉनॉमी थ्री टायर वातानुकुलीत डबे जोडण्यात येणार आहे. यापूर्वी दोन्ही एक्स्प्रेसना ११ स्लीपरचे डबे हाते. त्यानंतर एक्सप्रेस ९ स्लीपर श्रेणीच्या डब्यांच्या धावत होत्या. त्यातही आणखी २ डब्यांची कपात करण्यात आल्याने कोकणवासियांची मोठी गैरसोयच होणार असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. www.konkantoday.com
Back to top button