
वैभव खेडेकरांनी केलेल्या नियुक्त्या मनसेप्रमुख राज ठाकरेंकडून स्थगितमनसेच्या गोटात खळबळ.
रत्नागिरीमनसे नेते वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केलेल्या मनसेच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून गटबाजीचे वादळ घोंगावत असल्याचे दिसून येत आहे . एक महिन्यापूर्वी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्या सहाही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. तसे पत्र मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने काढण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या सचिन शिंदे, जुनैद बंदरकर, अरविंद मालाडकर, मिलिंद भाटकर, संदेश साळवी, राजेंद्र गांजरे या पदाधिकाऱ्यांना पदावरून नारळ देण्यात आला आहे.
मनसे नेते वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी जुनैद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष (राजापुर विधानसभा), अरविंद मालाडकर उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा), सचिन शिंदे तालुकाध्यक्ष (रत्नागिरी), मिलिंद भाटकर शहर अध्यक्ष (रत्नागिरी), संदेश साळवी तालुकाध्यक्ष (चिपळूण), राजेंद्र गांजरे शहर अध्यक्ष (चिपळूण) यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने स्थगित केल्याचे पत्र मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांनी काढले आहे.दरम्यान,पक्षात कोणाचीही मनमानी चालणार नाही. हा पक्षनेतृत्वाने दिलेला कौल म्हणता येईल अशीच चर्चा आता रंगू लागली असल्याचे दिसून येत आहे.