
शिवसेनेचे खासदार तिथं उपस्थित नव्हते, हो नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत होतो तेव्हा ते सर्वजण माझ्यासोबत होते- उद्धव ठाकरे यांचा खुलासा
केंद्र सरकारनं आणलेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकावरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. काही मुस्लिम नेत्यांनी ठाकरेंच्या मातोश्री निवासाबाहेर आंदोलन करत ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती.तसंच आज ठाकरेंना यावरुन डिवचणारे पोस्टर्स वर्सोवात झळकले आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाबाबत आपली भूमिका जाहीर सभेत स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या विधानसभेसाठीच्या पहिल्याच संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, “काल मोदींनी ‘सेक्युलर संविधान’, ‘सेक्युलर नागरी संहिता’ असा उल्लेख केला. मग काय त्यांनी हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न माणणाऱ्या चंद्राबाबू नायडूंच्या आणि नितीशकुमार यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. मग तुम्ही हिंदुत्व सोडलं नाहीत का? मग उगाच आपल्यात आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं विधेयक का आणलं? बरं आणलंत तर आणलं, हिंमत होती तर बहुमत तुमच्याकडं असताना मंजूर करुन का नाही दाखवलं?”नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारुन केली होती? मग आज बहुमत तुमच्याकडं असताना तुम्ही हे नाटकं आणि ही थेरं का केलीत? शिवसेनेचे खासदार तिथं उपस्थित नव्हते, हो नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत होतो तेव्हा ते सर्वजण माझ्यासोबत होते. त्या विधेयकावर चर्चा करायचं ठरवलं असतं तर माझे खासदार बोलले असते काय बोलायचं ते. पण जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल तसंच तुम्ही आमच्या हिंदू संस्थानाच्या जमिनी लुटता आहात, लाटता आहात आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. हिंदू मंदिरांच्या किती जमिनी राजकारण्यांनी ढापल्या याची यादी काढा एकदाचा तो प्रश्न धसास लावा, अशी मागणीही यावेळी ठाकरेंनी केली.वक्फ बोर्ड तर बाजुला ठेवा माझ्या मंदिराची जमीन जर चोरली जात असेल आणि त्यावर तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर मी आज जाहीर करतो की वक्फ असेल किंवा हिंदू संस्थानाच्या किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील तर त्यात आम्ही वेडंवाकडं काही होऊ देणार नाही.