योजक ….उद्योजक …..नानासाहेब भिडे
योजक असोसिएट्स या नावाने कोकणातील उत्पादने भारतातल्या अनेक शहरात पोहोचवणारे, रत्नागिरीच्या मधल्या आळीत राहणारे, अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारे कृष्णा परशुराम भिडे उर्फ नानासाहेब भिडे आज इहलोकीची यात्रा संपवून गेले.
नानासाहेब भिडे म्हणजे उद्योजकांसाठी आदर्श वस्तुपाठच. कल्पकता, धडाडी, कष्टाळू वृत्ती, कोकणी माणसाचा चिवटपणा, आणि मृदू स्वभाव यामुळे नानानी असंख्य माणसे जोडली, अनेकांना रोजगार दिला आणि कोकणच्या रानमेव्याला योजकच्या माध्यमातून नवा आयाम मिळवून दिला.
नानासाहेब भिडे गेली अनेक वर्ष आमच्या घरी येत असत. लोटे परशुराम महामार्गावरून प्रवास करताना आमच्या घरी ते कधी थांबले नाहीत असा त्यांचा एकही प्रवास नसेल. अनेकदा आमच्या आग्रहाखातर ते आमच्या घरी मुक्कामाला असायचे. वसुधा काकू त्यांच्याबरोबर खूप वेळा प्रवासात असायच्या. रात्रीच्या वेळी नानांचे अनुभव, गप्पा ओघामध्ये आम्ही ऐकले आहेत.
रत्नागिरीतल्या छोट्याशा हॉटेल मधून व्यवसायाची सुरुवात करून वेगवेगळे उद्योग सुरू करून उद्योजकीय कल्पकता नानांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली. कोकम सरबता पासून सुरुवात करून कोकणात तयार होणाऱ्या आंबा, फणस, काजू,जांभूळ, करवंद या फळांना नव्या रुपात आणि आकर्षक पॅकिंग मधून कोकण बाहेर पोहोचलं आणि लोकप्रियही केलं.
योजकची जांभुळवडी आणि फणस पोळी जिभेवर विरघळते तेव्हा ओरिजिनल फळांची चव कायम असल्याच लक्षात येतं. मोहरीचा आंबा म्हणजे उकडंबा, मोरांबा यासारख्या कोकणात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या पदार्थांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोचवलं. योजनेची इन्स्टंट खिचडी अनेकांच्या भुकेचा चा आधार ठरते आणि तितकीच लोकप्रिय होते.
पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. नवीन उत्पादन किंवा नवीन व्यवसाय स्वामींच्या आशीर्वादाशिवाय नानांनी कधी सुरूच केला नाही. स्वच्छ पांढरा लेंगा आणि शर्ट असा त्यांचा पेहराव असायचा. अत्यंत साधी राहणी होती. त्या साधेपणात ही प्रशस्तता आणि राजस्वता होती. व्यवसायातील काटेकोरपणा, चित्पावनी वृत्तीतील काटकसर, सामाजिक जबाबदारीचे भान, सामंजस्य हे सारे गुण नानांच्या ठायी एकवटले होते.
मी रत्नागिरीतील त्यांच्या घरी अनेक वेळा गेलो आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यातला त्यांच्याकडचा तो कामाचा व्याप, नानांची सर्वच विषयांकडे बघण्याची चौकस दृष्टी, अनेक कामे एकावेळी हातावेगळी करायची हातोटी, मी अनेकदा पाहिली आहे. पण अशाही घाईगडबडीच्या दिवसात त्यांनी येणाऱ्या माणसाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही किंवा त्याला विन्मुख करून पाठवलं ही नाही.
पु ल देशपांडे म्हणतात तसंच आहे, रत्नागिरीतल्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. या रत्नागिरीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक दिले, भागोजी शेठ किर यांच्या सारखे महान नेते देशाला दिले. अशाच लोकोत्तर यादीतील एक कृष्णा परशुराम भिडे उर्फ नाना भिडे होते एवढं मात्र नक्की..
आज नानांच्या जाण्याने खूप दुःख होत आहे, नानांच्या स्मृतीस अभिवादन!
डॉ.प्रशांत पटवर्धन.
पटवर्धन लोटे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी.