
दापोली तालुक्यात आणखी सुमारे बारा हजार चाकरमानी येण्याच्या तयारीत
दापोलीला साडेअकरा हजारपेक्षाही अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत
दापोली तालुक्यात आणखी सुमारे बारा हजार चाकरमानी येण्याच्या तयारीत लाॅकडाऊन शिथील झाल्यामुळे आपल्या गावाची आस लागलेली पुणे-मुंबई येथील फक्त दापोली तालुक्यातील अकरा हजार सहाशे सहासष्ट मंडळी आपल्या लेकूरवाळ्यांसहीत गावागावात दाखल झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
बदललेल्या शासनाच्या आदेशानुसार पुणे-मुंबई किंवा परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची नोंदणी व तपासणी करून त्यांना होमक्वारंटाईन चा शिक्का मारून त्यांच्या घरीच पुढील चौदा दिवस रहाण्यास सांगण्यात येत आहे. सदर बाहेरून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरात रहाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्यास ग्राम कृती दलाने गावातील जि.प.शाळा, समाजमंदिर, मंगलकार्यालय इ.ठिकाणी व्यवस्था करायची आहे.
सदर नागरिकांनी रिपोर्ट आल्यावरही चौदा दिवस गावात कोठेही संचार करायचा नाही.
*होम क्वाॅरंटाईन केलेल्या व्यक्ती गावात फिरताना आढळल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाकडे तक्रार करायची आहे या व्यक्तींची आरोग्य सेतू अॅप द्वारा नोंदणी होणे आवश्यक आहे.
घरातच स्वंतत्र रहाणा -या व्यक्तींनी घरातील इतर सदस्यांच्या संपर्कात सोशल डिस्टंन्स सामाजिक अंतर ठेऊनच वागावे. घरातील सर्वच व्यक्तीनी मास्क, सॅनिटायझर व हात धुण्याचा साबण याचा नियमित वापर करावा . गरोदर महिला, दहा वर्षे खालील बालके ,ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अशी सूचना जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.
दापोली तालुक्यात अशा होम क्वाॅरंटाईन केलेल्यापैकी पाच व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामसुरक्षादलावरील जबाबदारी आता अधिक वाढली आहे.सदर होम क्वाॅरंटाईन केलेल्या व्यक्तींची आशा व आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या कोव्हिड योद्धा वारंवार चौकशी करून नोंद घेत आहेत. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील व ग्रामकृतीदलाला प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दापोली तालुक्यातील प्रत्येक नागरिकानी सजग राहून आपल्या शहरातून आलेल्या नातलगांची व ग्रामस्थांनी या मंडळींची आस्थेने काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचसमवेत कोणत्याही प्रकारे *गावात आलेल्या चाकरमानी मंडळीनी कोणतेही धाडस करून आणि ,”मला काय होतय किंवा मी ठणठणीत आहे माझ्यामुळे कोणाला काय होणार नाही”. असे वागू नये व नियम पाळावेत गावात अशांतता व भीतीचे वातावरण होऊ नये म्हणून या मंडळींना विश्वासात घेऊन, प्रेमाने संपर्क करून गावाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी विनंती करायची आहे. त्यांना गावबंदि करून अधिक मनस्ताप न देण्याच्या सूचनाही शासनाने केल्या आहेत.मनात कोणतीही शंका उत्पन्न झाल्यास ग्रामकृतीदलाकडून निरसन करून घ्यावे व कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता व घाबरून न जाता कोरोना युद्ध जिंकण्यासाठी सकारात्मक विचाराने रोगप्रतिकार शक्ती वाढवून सर्व नियम पाळून या महामारीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com