हर्णे बंदरातील मासेमारी नौकेला आंजर्ले खाडीमध्ये जलसमाधी, सुदैवाने खलाशी वाचले
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासेमारी नौकेला आंजर्ले खाडीमध्ये जलसमाधी मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नौकेवर असणाऱ्या खलाशांनी लगेचच पाण्यात उड्या घेतल्याने जीवितहानी टळली.सध्या कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर असताना आंजर्ले खाडीमध्ये पाजपंढरी येथील नौका“कैलासपती” (IND-MH-04-MM-737) नौका मालक – श्री. काशीनाथ महादेव पाटील यांच्या या मासेमारी नौकेला खाडीच्या तोंडावरच जलसमाधी मिळाली.
दुसऱ्या लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारनेच घालून दिलेल्या नियमावलीमध्ये मासेमारी व्यवसायाला परवानगी दिली. म्हणूनच काही नौकांनी मासेमारीला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे काल सकाळी पाटील यांची नौका सुवर्णदुर्ग किल्ल्यापासूनच जवळपाच्या अंतरावर मासेमारी करत होती. परंतु गेल्या दोनतीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पावसाळी ढगाळ वातावरण होऊ लागले आहे. तसेही दरवर्षी या दिवसात मच्छीमारांची नौका किनाऱ्यावर घेण्याची घनघाई सुरू असते. त्याप्रमाणे काल सकाळी अचानक पावसासारखे वातावरण होऊन जोराचा वारा सुरू झाला होता. त्यामुळे वातावरण बिघडतय अस दिसून आल्याने ताबडतोब मासेमारी थांबवून बोट थेट लगबगीने आंजर्ले खाडीच्या दिशेने फिरवली. खाडीच्या तोंडावर येताना मात्र प्रचंड गाळ साचला आहे. याठिकाणी नौका आत खाडीत घेताना येथील मच्छीमारांची चांगलीच कसरत असते. वादळाची चिन्हे दिसू लागली म्हणून खाडीत बोट घेण्याच्या नादात बोट साचलेल्या गाळावर आदळून गाळातच रुतली. त्याचक्षणी नौकाचालकांने बोट रुतलेल्या गाळातून मागे घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. कारण त्यातच अजस्त्र लाटांचा जोरदार मारादेखील नौकेवर वेगाने होत होता. वातावरण गढूळ झाल्याने समुद्र देखील खवळला होता. त्यामूळे बोट पुढे पण घेता येईना का मागे देखील घेता येईना त्यामूळे मोठमोठ्या लाटांचे पाणी पूर्णपणे नौकेत घुसल्यामुळे त्याचठिकाणी त्या नौकेला जलसमाधी मिळाली. नौकेत पाणी पूर्ण घुसल्याचे दिसताक्षणी खलाशांनी पोबारा करून मदत मागितली परंतु जवळपास कोणीही नसल्याने नौका वाचू शकली नाही. मात्र खलाशांनी पाण्यामध्ये उड्या मारून आपला जीव वाचवला. सदरची नौका पूर्णपणे जलमय झाल्यामुळे नौकेतील माशीनसह सर्व समान पाण्यात बुडाले. परंतु लगेचच मदत कार्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थ एकवटले. सदर घटनेचा मत्स्यव्यवसाय खात्या कडून पंचनामा झाला असून या घटनेमध्ये या नौकेचे २८ लाखांचे नुकसान झाले आहे. असे खात्याकडून सांगण्यात आले.