
जिल्ह्यातील रिक्षा व्यवसायिक अजुनी अनुदानापासून वंचित
काेराेनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला होता आर्थिक अडचणीत आलेल्या परमिटधारक रिक्षा व्यावसायिकांना शासनाने एक हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेत मोबाईल नंबर, बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्याने जिल्ह्यातील निम्मे रिक्षा व्यावसायिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंतरत्नागिरी जिल्ह्यात पाच हजार २०८ रिक्षामालकांनी अर्ज केले होते. त्यापैकी चार हजार २२० रिक्षा व्यावसायिकांना मदत देण्याची शिफारस उपप्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. परमिटधारक रिक्षा व्यावसायिकांचा आकडा १० हजारांदरम्यान आहे.
रिक्षा व्यावसायिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे, यासाठी अर्ज आल्यावर तत्काळ त्याची छाननी करून योग्य अर्जाला अनुदान दिले जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रिक्षा व्यावसायिकांच्या आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, तर अनेकांच्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंक नसल्याने निम्म्याहून अधिक रिक्षा व्यावसायिक अनुदानापासून वंचित आहेत. कागदपत्र पूर्ण करून जास्तीत जास्त रिक्षा व्यावसायिकांना अनुदान मिळवून देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी सांगितले. www.konkantoday.com