कोकणच्या आरोग्याचा खेळ खंडोबा, सत्ताधाऱ्यांची अक्षम्य बेपर्वाई – अॅड दीपक पटवर्धन

कोरोनाचे संकट रत्नागिरीमध्ये अधिक गडद होत आहे. ७५ ची संख्या पार झालेले कोरोना रुग्ण मुंबई आणि अन्य ठिकाणाहून रत्नागिरीत परतणारे नागरिक, अपुरी आरोग्य सुविधा, प्रलंबित असणारे हजारो स्वॅब टेस्ट रिपोर्ट, गावोगावी बाहेर शहरातून पोचलेले नागरिक त्यामुळे गावागावात वाढलेली बैचेनी, उद्वेग व भिती. पोलिस, आरोग्य व अन्य यंत्रणेवर पडत असलेला असह्य ताण आणि सत्ताधीश पक्षांचे असलेले सर्व लोकप्रतिनिधी यांची निद्रिस्त स्वरुपाची भूमिका या सर्व अनागोंदीमुळे रत्नागिरी जिल्ह्यावासियांचे व येणाऱ्या भूमिपुत्रांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि या परिस्थितीला पूर्णांशाने सत्ताधारीच जबाबदार आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून रत्नागिरी जिल्हा भा.ज.पा मागणी करतायत आरोग्य सुविधा वाढवा, स्वॅब तपासणी लॅब रत्नागिरीत सुरु करा. चाकरमानी व अन्य भूमिपुत्रांना रत्नागिरीत परतायचे असेल तर आधी आरोग्य सुविधा वाढल्या पाहिजेत. अन्यथा स्थानिक व येणारे मुंबईकर या सर्वांचेच आरोग्य धोक्यात येईल. मात्र शासनाने मनमानीपणे मुंबईतून रत्नागिरीत नागरिकांना येऊ दिले पण त्यांच्या आरोग्य सुविधेबद्दल कोणताही विचार केला नाही आज दुर्दैवाने म्हणावे लागते की गेले दोन तीन दिवस स्वॅब तपासणी कीटही पुरेश्या संख्येत उपलब्ध नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. ७ कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्याचे बोलले जात आहे मात्र प्रत्यक्षात सर्वच सुविधा अपूर्ण आणि तोकड्या असल्याचा अनुभव येतो.
स्वॅब टेस्टिंग लॅब उभारण्याचा निर्णय शासन घेत नाही. लोकप्रतिनिधीही २ महिने याबाबत पाठपुरावा करत नाहीत हे जनतेचे दुर्दैव आहे. प्रलंबित असलेले मोठ्या संख्येतील स्वॅब, न तपासणी झालेले नागरिक त्यांचा समाज्यामधील वावर या सर्वांमुळे धोका अधिक वाढतो आहे. दोन महिने स्थानिकांनी लॉकडाऊन पाळले आणि आता कोरोनाग्रस्त भागातील नागरिकांचा खुलेआम सुरु असलेला वावर, बाह्य जिल्ह्यातील फिरणारी वाहने या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा व शासकीय कर्मचाऱ्यांची होत असलेली परवड या सगळ्याला नजरअंदाज केले जात आहे.
सातत्याने प्राप्त झालेला विजय, शासनातील मोठी पदे त्याचा अधिकार या सर्वांमुळे सत्ताधीशांचा जनतेशी असलेला कनेक्ट तुटला आहे आणि सत्तेच्या कैफात बेपर्वा वर्तनाला ऊत आला आहे. शासन यंत्रणेत पालक मंत्र्यांच्या पदाला जिल्ह्यासाठी महत्व असते मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री जाणवलेच नाहीत. मुंबईकर आपले बांधव हे स्थानिकांनी कधीच नाकारले नाही त्याची आठवण करून भावनिक व्दंद लावून आपल्या अक्षम्य अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालू आहे याचीही कीव करावी वाटते. अशी बोचरी टीका भा.ज.पा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी केली आणि ही वेळ राजकीय टिपा टिप्पणीची नाही याचे भान आहे मात्र सातत्याने चाललेली बेपर्वाई पाहता स्पष्ट खडेबोल सुनावणे आवश्यक वाटते.
भा.ज.पा रत्नागिरीची ताकद कमी असेल पण या कठीण प्रसंगी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत रचनात्मक काम करणे अपेक्षित आहे. ज्या व्यवस्था उभारण्यासाठी सहयोग देता येईल तो देण्यासाठी आम्ही तयार आहोत असे अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button