“के. झेड. क्रिएटीव्ह” च्या माध्यमातून कोकणात लवकरच फिल्म इंडस्ट्री: मा. मंत्री उदय सामंत
रत्नागिरीतील फिल्म आणि मालिकांचे सक्रीय प्रोडक्शन म्हणजे " के. झेड. क्रिएटीव्ह" ही टीम. गेले तीन चार वर्षे ह्या मंडळींनी लघुपट, वेबमालिका आणि "भोवनी" सारखा पूर्ण लांबीचा चित्रपट पूर्णतः रत्नागिरीत उभा केला. हे सर्व कलाकार र. ए. सोसायटीच्या रमेश कीर कला अकादमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेत... गेली काही वर्षे ही टीम कोकणामध्ये, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात चित्रपट,मालिकांची व्यावसायिक निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यामुळे आपल्या कोकणात या क्षेत्रातील व्यवसाय सुरू होईल आणि कोकणातल्या प्रत्येक कलाकाराला इथेच मुबलक काम आणि योग्य मानधन मिळेल हे ध्येय. सध्याच्या या कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनमुळे पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी चित्रपट, मालिकांचे शुटींग बंद आहे पण सुरक्षित काळजी घेऊन ,काही अटी,नियम तयार करून कोकणात शुटींग सुरू करण्याची परवानगी मिळाली तर ( अर्थात स्थानिक कलाकारांचा,तंत्रज्ञांचा सर्वाधिक समावेश हा आग्रह ) आपल्याकडे या क्षेत्रातले निर्माते, प्रोडक्शन्स येतील आणि कायमस्वरुपी व्यवसाय सुरू होईल अशा विचारांचा एक प्रकल्प काल के. झेड चे प्रमुख "प्रदीप शिवगण" यांनी "मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत" साहेबांसमोर मांडला. या चर्चेच्यावेळी मा. मंत्री म्हणाले," सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेक्षेत्रही ठप्प झालं आहे. कोकणातले अनेक कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार मुंबईमध्ये या क्षेत्रात काम करत होते. त्यांचा रोजगार गेला आहे तर या सर्वांसाठीच आणि स्थानिक कलाकारांसाठी ही मोठी संधी इथं उपलब्ध होणार आहे. या सर्वांनीच आता के. झेड च्या या तरूण कलाकारांसोबत काम सुरू करावं. मी मंत्री म्हणून या सर्वांच्या पाठीशी उभा आहेच पण या राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबही या सर्व तरूण मंडळींना विविध प्रकारे सहकार्य करतील असा मी विश्वास देतो", असं सांगताना मा. सामंत साहेबांनी राज्यातल्या इतर दिग्गज दिग्दर्शक व निर्मात्यांना इथं रत्नागिरीत येवून शुटींग करावं त्यासाठी मी सहकार्य करायला तयार आहे, असं आवाहन केले. आपल्या जिल्हयात एक कायमस्वरूपी फिल्म इंडस्ट्री किंवा शुटींग सेंटर्स सुरू व्हावीत यासाठी मी नेहमी सहकार्य करेण असे त्यांनी जाहीर केले. याबाबतीत के. झेड चे प्रमुख प्रदीप शिवगण म्हणाले, विविध शुटींगसाठी लागणारे इक्वीपमेंट्स,इन्फ्रास्ट्रक्चर आणि कारागीर तंत्रज्ञ आम्ही रत्नागिरीत उभे केलेले आहेत. तसेच जवळपास दीडशे कलाकार तंत्रज्ञांशी बोलून त्यांनाही संलग्न करून घेतलेले आहे आणि आमची KZ creative company आणि संपूर्ण टीम यासाठी अनुभवानिशी सज्ज आहे.
या सर्व चर्चेसाठी रत्नागिरीतील कलाकार सचिन गावणकर, हृषीराज धुंदूर, सचिन सावंत, शुभम वाडकर, डाॅ. नितीन चव्हाण व प्रदीप शिवगण उपस्थित होते..
www.konkantoday.com