
सीमेन्सच्या परतीसाठी जहाज वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचे सहकार्य,माजी आमदार बाळ माने यांच्या पत्राचा पाठपुरावा
रत्नागिरी-कोरोना लॉकडाऊनमुळे मालवाहू बोटींवरच अडकून पडलेल्या सीमेन्सनी नुकताच जहाज वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया व डायरेक्टर जनरल (शिपिंग कंपनी) अमिताभ कुमार यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. आता मंत्री व डायरेक्टर जनरल यांच्या संवादामुळे कोकणातील सीमेन्स लवकरच परततील, अशी आशा आहे.
तीन दिवसांपूर्वी माजी आमदार बाळ माने यांनी कोकणातील सीमेन्सना आणण्याकरिता केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. त्याचा पाठपुरावा मंत्र्यांकडून होत आहे. कोकणात किमान एक हजारांहून अधिक सीमेन्स आहेत. 22 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक जण विविध देशांत अडकले. काहींना नोकरीवर जायचे होते ते लॉकडाऊनमुळे जाऊ शकत नाहीत. यामुळे नोकरी जाण्याची भीतीसुद्धा या सीमेन्सच्या मनात आहे. कुटुंबीयसुद्धा घाबरले आहेत. परंतु या सर्वांना माजी आमदार बाळ माने यांनी धीर दिला आहे.
सीमेन्सच्या साईन इन व ऑफच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचेही मंत्री मांडविया यांनी सांगितले आहे. तसेच सीमेन्सना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. भारतातील युवकांना किमान 5 लाख रोजगार मिळाले पाहिजेत, याकरिता प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे कोणाची नोकरी जाणार नाही. साईन इन व साईन ऑफ होत नसेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलू. ज्या देशात तुम्ही साईन ऑफ कराल तिथून तुम्हाला परत आणू. कोणालाही अडचण असेल तर संपर्क साधा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्रीमंडळाने आपली जबाबदारी घेतली आहे, असे मांडविया यांनी स्पष्ट केले आहे. नोकरीवरून भारतात परतल्यानंतर संबंधित सीमेन्सला क्वारंटाइन व अन्य खर्चाची जबाबदारी सीमेन्सवर येणार नाही. साईन ऑफ वेळी कोणतीही अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.
सीमेन्सना परत येण्याकरिता व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये संबंधित शिप कंपनी आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कोकणात सीमेन्सची संख्या भरपूर आहे. यातील काहींच्या कुटुंबियांनी संपर्क साधल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
पहा काय म्हणाले जहाज वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया
https://youtu.be/IEBmVVqWw_0