
आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार
जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे. गुरगावमधली खासगी प्रवास कंपनीने १५ ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे. ‘बस टू लंडन’ असं या सेवेचं नाव आहे. या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकता.
७० दिवसांच्या दिल्ली ते लंडन या प्रवासात तुम्हाला १८ अन्य देशांमधून जावं लागेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स मधून युकेमध्ये पोहोचेल.दिल्लीचे रहिवासी असलेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने हा प्रवास केला होता. अशाच पद्धतीने यंदा २० जणांना सोबत घेऊन बसने प्रवास करण्याचा प्लान आहे.’बस टू लंडन’चा प्रवास ४ भागांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रवाशांकडे वेळ कमी असेल आणि त्यांना लंडनपर्यंतचा प्रवास करता येत नसेल, तर ते ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतील. दिल्लीपासून लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी ईएमआचा पर्यायही देण्यात आला आहे.
www.konkantoday.com