कोकणातील हजारो सीमेन्सना गावी आणण्यासाठी भाजपा नेते बाळ माने यांचे प्रयत्न


विविध मालवाहू जहाजांवर काम करणार्‍या कोकणातील अधिकारी, सीमेन्सना परत आणण्याकरिता भाजपचे कोकणातील नेते बाळ माने यांनी पुढाकार घेत डीजी शिपिंग व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. कोकणात किमान पाच हजार सीमेन्स असून त्यातील बरेचजण नोकरीवर आहेत. कोरोना संकटकाळात हे सारेजण घरी परतून यावेत, अशी त्यांच्या नातेवाइक, कुटुंबियांची मागणी आहे. लवकरच ते परततील, याकरिता माने यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या संकटात मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था सुरू आहे. परदेशांत राहणार्‍या भारतीयांना परत आणले जात आहे. मात्र समुद्रात बोटीवर नोकरी करणार्‍या सीमेन्सना आणण्यासाठी अद्याप व्यवस्था झालेली नाही. याकरिता डीजी शिंपिग व मेरिटाइम बोर्डाकडून काही सूचना दिल्या आहेत. आंबा, काजू, मच्छीमारांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करताना सीमेन्सचा प्रश्‍नही सोडवावा, अशी मागणी श्री. माने यांच्याकडे सीमेन्सच्या कुटुंबीयांनी केली आहे.
जहाजाच्या डेकवर कॅप्टन, चीफ ऑफिसर, सेकंड व थर्ड ऑफिसर आणि इंजिन विभागात चीफ इंजिनियर व सेकंड, थर्ड व फोर्थ इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, चीफ कुक यासह सीमेन्स काम करत असतात. एक लाख टनाच्या जहाजावर सुमारे 24 ते 25 अधिकारी, सीमेन्स काम करतात. सायनिंग ऑफ म्हणजे ड्युटी संपताना नेहमी जवळच्या बंदरात सोडण्याची व्यवस्था जहाज कंपनीतर्फे केली जाते. तिथून विमानाने गावी परत येण्याची सोय केली जाते. परंतु कोरोना महामारीमध्ये विविध देश अडकले असून वाहतूक बंद आहे. त्यामुळे या सीमेन्सना कोकणात यायचे तर खूप दिवस जाणार आहेत. तसेच तपासणी, क्वारंटाईन होणे आदी अनेक अडचणी आहेत. त्याकरिता योग्य मार्ग लवकरच काढण्यासाठी श्री. बाळ माने यांनी डीजी शिपिंग व भारत सरकारकडे संपर्क साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button