‘गिरा तोभी टांग उपरच- ‘ राष्ट्रवादीचा कांगावा !
‘राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार’ विषयआता संपुष्टात आलाआहे. जी गोष्ट कधीही कायदेशीरपणे होणार नव्हती ती राजकीय दडपणाखाली करण्याचा आघाडीतल्या घटक पक्षांनी जीवापाड प्रयत्न केला. यासाठी राजभवनाच्या गरिमेला ही धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला गेला. यात पुन्हा स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे संजय उगाचच ‘उवाच’ झाले, आणि त्यांनी आपली पातळी दाखवून दिली.
“राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारपदी विद्यमान मुख्यमंत्र्यांची निवड करा “असा धोशा काँग्रेस पक्षाने लावला होता.त्या पदावर विद्यमान मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केव्हाही होऊ शकणार नाही याची काँग्रेस धुरिणांना पूर्ण कल्पना होती. अशा वेळी ‘तोंड देखले आपण मुख्यमंत्र्यांचे पाठिमागे राहिल्या’चे दाखवायचे आणि वेळ येताच “आपल्या माणसा”ला त्या पदासाठी पुढे करायचेअसे राजकीय षड्यंत्र काँग्रेस पक्षातर्फे रचण्यात आले होते. २७ मे नंतरच्या याच स्वप्नात सगळे काँग्रेस नेते मश्गूल होते.
परंतु महामहिम राज्यपालांनी अशा कोणत्याही राजकीय ‘ढुशां’ना दाद दिली नाही,आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पदाला अस्थिरता येऊ दिली नाही . राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या अशक्यतेबाबतचे आपले कायदेशीर म्हणणे त्यांनी कायम ठेवले, आणि निवडणूक आयोगाला आवाहन करून इतर आमदारांच्या निवडणुकींचा कार्यक्रम घेण्याचा मार्ग सुचवला,आणि संपूर्ण प्रश्नाचे ‘संयत’पणे निराकरण केले. यासाठी आदरणीय राज्यपाल आणि राजभवनचे प्रशासकीय सल्लागार अभिनंदनास पात्र आहेत.
एका बाजूला हा कार्यक्रम चालू असताना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मा. राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. शिवाय बहुदा त्यांना राष्ट्रवादी कटकारस्थानाची कल्पना आलयामुळे त्यांनी थेट आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याशी फोनवरून बोलणे केले. यानंतरच्या हालचालीमुळे आणि महाराष्ट्राच्या सौभाग्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न सुरळीतपणे मार्गी लागला.
असे झाल्यामुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘स्वप्नांचा आरसा’ खळकन फुटला, आणि आपल्या शकुनीनीतीचा यावेळी काहीही उपयोग झाला नाही याची काँग्रेस जणांची खात्री झाली.अशा वेळी त्यांनी आजपर्यंतच्या अनुभवावरून कमावलेली ‘”गिरा तो भी टांग उपर” ही खेळी खेळायला सुरुवात केली. खरे तर आघाडीचे सर्व पक्ष तोपर्यंत केवळ राज्यपाल नियुक्त आमदारकी या एकाच नथीतून मा. प्रधान मंत्री आणि माननीय राज्यपाल यांच्यावर तीर मारत होते,आणि अश्लाघ्य टिपणी करत होते.निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या मार्गाची त्यांना माहितीसुद्धा असल्याचे दिसून आले नाही,आणि तसा त्यांनी उल्लेखही केला नव्हता.
पण आता मात्र जणू काही आपणच हा मार्ग काढला असा टेंभा मिरवून “भाजपचा राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला” आणि “राज्यपालांना जमालगोटा ” अशा शीर्षकाच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांकडून छापून आणून राष्ट्रवादीचे मंत्री आपले काळे झालेले तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत .
पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे सुजाण आहे. काय घडले ते त्यांनी जाणले आहे व समजूनही घेतले आहे.आपल्या स्वार्थी राजकीय मनोरथांसाठी लोकशाहीचे प्रमुख असलेल्या माननीय पंतप्रधान आणि आदरणीय राज्यपाल यांच्याविरुद्ध करणेत आलेल्या आरोपांनी जनता व्यथितआहे. त्याचबरोबर आपल्या राजकीय पराभवाचा सूड घेण्यासाठी भाजपाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचे विरुद्ध त्यांचेकडून वारंवार केल्या जात असलेल्या गलिच्छ व अश्लाघ्य आरोपानी जनता संतप्तही झाली आहे.
ॲडव्होकेट बाबा परुळेकर
ऊर्जाभाजपा रत्नागिरी