व्यसन : चांगले-वाईट
गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय म्हणून प्रत्येक देशाचे शासन लॉकडाऊन या पर्यायाचा अवलंब करत आहे. लॉकडाऊनचा विचार करता जिवंत राहण्यासाठी घरी राहणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर कोरोना हा विषाणू “शाप की वरदान” या संभ्रमावस्थेमध्ये व्यक्ती आहेत. हा आजार झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
परंतु याची दुसरी बाजू विचारात घेतली तर ती सकारात्मक आहे. लॉकडाऊनमुळे या अगोदरच्या काळात एवढा कालावधी कुटुंबाला देणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते. अनेक व्यक्तींना स्वत:च्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तसेच विविध नवनवीन कला गुण शिकण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. या कलागुणांचा भविष्यात सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे. अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज करू शकतो. उगाचच भीती मनात बाळगत होतो आता अनेक व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढला असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
अनेक परिवार किंवा व्यक्तीचे संसार व्यसनाधीनतेमुळे उघड्यावर आले होते. शासनाच्या या लॉकडाऊनमुळे बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीनतेवर सुद्धा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आता सहज व्यसनासाठी उपलब्ध होणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत. अनेकजण व्यसनातून बाहेर पडल्याचे चित्र समाजामध्ये दिसत आहे. घरामध्ये राहून स्वत:चे कुटुंब, कुटुंबातील व्यक्तींचे महत्व प्रत्येकाला समजत आहे. व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकल्यामुळे चांगल्या गोष्टीपासून दूर लोटलेल्या व्यक्ती आता चांगले गुणकौशल्य आत्मसात करताना दिसत आहेत.
मानसशास्त्रीय अभ्यासक सांगतात की, “कोणतीही व्यसनी व्यक्ती पहिल्याच दिवशी व्यसनी होत नाही.” प्रथम त्या व्यक्ती एखादी गोष्ट करून पाहतात. महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा व्यसन करतात, त्यानंतर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करतात. त्यावेळी त्या व्यक्तीने समजावे की, आता आपल्याला त्या गोष्टीची सवय होत चालली आहे. पुढे-पुढे ती गोष्ट प्रत्येक दिवशी केली जाते किंवा दिवसातून वारंवार केली जाते. त्या गोष्टीची असलेली सवयीचे रुपांतर व्यसनात होते. ‘एखादी सवय सोडणे सोपे असते, परंतु व्यसन सोडणे अवघड आहे.’
सलग २१ दिवस केलेली कोणतीही गोष्ट ही प्रथम सवय बनते आणि नंतर त्याचे व्यसन होते. मग ती चांगली किंवा वाईट असेल. भगवान महावीर म्हणतात, “हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, परंतु एक व्देष दूर करणे फार कठीण आहे.” व्यसन चांगल्या गोष्टींचे असेल तर सामान्य व्यक्ती सर्वश्रेष्ठ होते, परंतु व्यसन हे वाईट गोष्टीचे असेल तर सर्वश्रेष्ठ व्यक्तीसुद्धा अति सामन्यातील सामान्य होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: ठरवायचे आहे की, ‘व्यसन करताना चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे….’
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.