
चाफे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मारहाण करणार्या पाच जणांना शिक्षा
रत्नागिरी : चाफे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याविरोधात उभा राहून निवडून आला, याचा राग मनात ठेवून मारहाण करणार्या 5 आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी 4 हजार प्रमाणे 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तो न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 2015 रोजी मिरवणेवाडी येथे हा प्रकार घडला होता. यात गाडीची काचही फोडण्यात आली होती.
सुभाष पुंडलिक रहाटे (56), भाग्यश्री सुभाष रहाटे (42), ओंकार सुभाष रहाटे (22), प्रशांत पुंडलिक रहाटे (30, चौघेही रा. चाफे, रत्नागिरी) आणि गजानन वसंत रहाटे (32, रा. तेली आळी, रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पद्मशेखर मुळये (29, रा.चाफे, रत्नागिरी) याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, 12 ऑगस्ट 2015 रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास पद्मशेखर मुळये आपल्या ताब्यातील टाटा एस गाडी (एमएच-08-डब्ल्यू-1344) घेऊन घरी जात होता. त्यावेळी शामल गावडे यांचे घर आल्यावर पद्मशेखरने गाडी थांबवली असता तिथे दबा धरून बसलेल्या सर्व आरोपींनी पद्मशेखर याला मारहाण केली होती.