विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणूक घ्या, राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र
विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक घ्या, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे
मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकरे सध्या विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. येत्या २८ मेपर्यंत त्यांना कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. विधान परिषदेची एप्रिल महिन्यात होऊ घातलेली निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली.मात्र, राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. बुधवारी ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी देखील राज्यात निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे तातडीने निवडणुका घ्याव्या अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
www.konkantoday.com