
चिपळूण हद्दीत महामार्गावर १४ हजार ७०० झाडे लावणारहायवे वृक्ष लागवड हक्क समितीचे आत्मक्लेष उपोषण स्थगित
चिपळूण:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी आत्मक्लेष उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतलेल्या हायवे वृक्ष लागवड हक्क समितीच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने महामार्गावर वृक्ष लागवडीच्या कामाला खड्डे खोदाईने प्रत्यक्ष सुरूवात केली आहे. तर चिपळूण हद्दीतील महामार्गावर १४ हजार ७०० झाडे लावण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने समितीने आत्मक्लेष उपोषण स्थगित केले. महामार्ग चौपदरीकरणात हजारों झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शासकीय निकषानुसार संबंधित ठेकेदाराने नवीन वृक्ष लागवडीला ठेंगा दाखविला होता. यासंदर्भात हायवे वृक्ष लागवड हक्क समितीने संताप व्यक्त करीत सोमवारी दि. १० जून रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या उपोषणाची जोरदार तयारीही झाली होती. मात्र उपोषणकर्ते व राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी, महाड विभागाचे शाखा अभियंता महाडकर, गुहागर-विजापूर महामार्गचे अधिकारी, इतर अधिकारी, तसेच ठेकेदार यांची संयुक्त बैठक राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात सकाळी पार पडली. चिपळूण विभाग अंतर्गत या महिन्याच्या अखेरीस सात हजार झाडे लावण्यात येतील. ही झाडे लावताना सर्व प्रकारचे निकष पाळले जातील. ज्यामध्ये खड्डे मारण्यापासून अंतर तसेच कोणत्या प्रकारची झाडे लावली पाहिजेत, या झाडांना ट्री गार्ड बसवण्यापर्यंत सर्व विषयांवर चर्चा झाली. या सर्व मागण्या राष्ट्रीय महामार्गाने मान्य केल्या.यावेळी समितीचे शाहनवाज शाह, सतीश कदम, सौ. सफा गोठे, किशोर रेडीज, सौ. आदिती देशपांडे, धनश्री जोशी, रामशेठ रेडीज, स्नेहा ओतारी, डॉ. रेहमत जबले, श्रीकृष्ण प्रभूदेसाई, अजय भालेकर, अशोक भुस्कुटे, सुनिल जांभेकर, भाऊ काटदरे, रईस अलवी, प्रकाश उर्फ बापू काणे, अजित जोशी, स्वाती भोजने, मंगेश वेस्वीकर, आसीम मुकादम, निहार कोवळे, सौ. पद्मा ओली, जमालुद्दीन बंदरकर, फैरोजा मोडक, नितेश ओसवाल, नयनीश गुढेकर, दिगंबर सुर्वे, महेंद्र कांबळी, विलास महाडिक, इंतिखाब चौघुले, सज्जाद काद्री, ॲड. संजय पाटील आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com