परजिल्ह्यात रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेचा अंत्यसंस्कार रत्नागिरीत ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली चौकशीची मागणी
कोल्हापूरमध्ये संशयित कोरोनाग्रस्त म्हणून निधन झालेल्या रुग्ण महिलेचे शव रत्नागिरीत आणून येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, हे सुदैवच. परंतु कोरोना संशयित असलेल्या रुग्णाचे शव जिल्हाबंदी मोडून रत्नागिरीत आणण्याची परवानगी आहे का, असा मुद्दा दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहिले असून आणखी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. प्रशासनाने याबाबत स्वच्छ भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यसंस्कार ज्या पद्धतीची खबरदारी घेऊन केले जातात, तसे अंत्यसंस्कार रत्नागिरीत या महिलेवर करण्यात आले. याचा अर्थ तिच्याबाबत संशय कायम होता. येथील स्थानिकांनी याबाबत विचारले असता त्यांच्याही शंकेचे निरसन करण्यात आलेले नाही. अशा तर्हेने शव जिल्हाबंदी मोडून कोणाच्या परवानगीने आणि का आणण्यात आले, ही महिला कोरोना संशयित रुग्ण होती तर तिचा मृतदेह रत्नागिरीत आणणे हे धोक्याचे ठरू शकते की नाही असा मुद्दाही पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.20 एप्रिलला कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर मिरकरवाडा अमरधाम येथील भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. ही महिला संशयित कोरोना रुग्ण होती. अंत्यसंस्कार झाले तेव्हा तिचे अहवाल प्राप्त झाले नव्हते, असे समजते. तिच्या मृत्यूचे कारण काहीही असले तरी रत्नागिरीत तिचे शव आणण्यात आले तोपर्यंत ती संशयित कोरोना रुग्णच होती, याकडे लक्ष वेधले आहे.
कोल्हापूरमध्ये मृत्यू झाल्यानंतर पार्थिव दुसर्या जिल्ह्यात कसे आणले गेले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश कसा देण्यात आला. ही महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी होती व माहेर रत्नागिरी जवळ असल्याचे कळत आहे रत्नागिरी प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक उत्तम रितीने कोरोनाची स्थिती हाताळत असताना असा गंभीर विषय कसा घडला. याबाबत जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे योग्य ती माहिती घेऊन स्पष्ट व सत्य माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती अॅड. पटवर्धन यांनी केली आहे
www.konkantoday.com