
पहिल्याच पावसात महाभ्रष्ट भाजपा महायुतीनं मुंबई डुबवली! मतं मागायला बोटीनेच घरोघरी जातील! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल!!!
:* काल राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांमधील पावसामुळे आताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. आता समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा बंद होऊन मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. याच मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली आहे. मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत असल्याचे सपकाळ म्हणाले. पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी असल्याचे सपकाळ म्हणाले.
*एका पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असा टोला देखील सपकाळांनी लगावला. मुंबईला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाहीत अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
माटुंगा, मस्जिद बंदर या रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात साचलेले पाणी आता फलटाच्या उंचीच्या जवळपास पोहोचल्याने येथील वाहतूक कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तर पूर्व द्रुतगती महार्गावर आणि एलबीएस मार्गावर भांडूप, कांजूर आणि सायन परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.