
करबुडे येथील अपघात प्रकरणी वरची निवेंडी येथील कार चालकावर गुन्हा
रत्नागिरी : निवळी-जयगड रस्त्यावरील करबुडे फाटा येथे सोमवारी झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघातात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार प्रमोद साळवी (राहणार- वरची निवेंडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचालक तुषार दशरथ घोसाळकर (वय 27, राहणार-पन्हाळा,कोल्हापूर) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना सोमवार 2 मे रोजी सकाळी 7.30 वा. घडली. जखमी कार चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमवारी सकाळी ट्रकचालक (एमएच-09-एल-6604) निवळी ते जयगड असा जात होता. यावेळी ओंकार साळवी कार (एमएच-04-जीजे-2717) घेऊन भरधाव वेगाने येत होता. ही दोन्ही वाहने करबुडे फाट्याजवळ आली असता ओंकारचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरून येणार्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला, इतकी ही धडक जोरदार होती. या अपघातात ट्रकचे पुढील उजव्या बाजूचे चाक निखळले. ग्रामीण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. यामुळे तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.