
अकरावी ऑनलाइन प्रवेशात चूक पडली महागात; ७७ हजार विद्यार्थी अपात्र!
यंदा राज्यभरात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सोमवारी पार पडली. आता दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर होत असताना पहिल्या फेरीत प्रथम प्राधान्यक्रम दिलेले महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे ७७ हजार ६६२ विद्यार्थी नियमानुसार पुढील दोन फेऱ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत. आता या विद्यार्थ्यांना चौथ्या म्हणजे खुल्या फेरीतच ज्या महाविद्यालांमध्ये जागा शिल्लक असतील, तेथे प्रवेश मिळणार आहे.अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या एक ते दहा पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अलॉट झाले होते. त्यापैकी ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले.
या ६.३२ लाख विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ५७हजार ८८१ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले होते. त्यामुळे हे विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करतील, अशी अटकळ होती, मात्र त्यापैकी फक्त ३ लाख ७५ हजार ७०९ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष महाविद्यालयात जात आपल्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.अनेक विद्यार्थी नजरचुकीने वेगळेच महाविद्यालय प्रथम प्राधान्यावर ठेवतात. काही जणांचा कॉलेजांच्या नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडतो. मुंबई विभागातूनही ८८ हजार ३३७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले होते. त्यापैकी ५३ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालय गाठलेच नाही.
*पहिल्या प्राधान्याचे महाविद्यालय अलॉट झालेल्या ३२८४ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी विविध कारणांमुळे प्रवेश नाकारला. तर ११८६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रद्द केला. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येईल. पण तब्बल ७७ हजार ६६२ विद्यार्थी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश उपलब्ध असूनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे नियमानुसार आता या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही.