पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून कोकणातील आंबा खरेदी करा! प्रमोद जठार यांची पेट्रोलियममंत्री ना.धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी
कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून आजच्या या कोरोनामय संकटात कोकणी शेतकऱ्याना सहकार्याचा हात दिला जावा. कोकणबद्दल आत्मीयता बाळगत या कंपन्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीच जास्त आंबा खरेदी करावा. या कंपन्यांच्या सीएसआर फंड वा अन्य तरतुदीतून हा आंबा खरेदी व्हावा. कोकणचा ब्रँड बसलेला हा दर्जेदार हापूस आंबा सदर कंपन्यांचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, विविध अनाथ अपंग लोकांच्या सेवाभावी सामाजिक संस्था यांच्यापर्यंत पोहोचवणे या कंपन्यांच्या नेटवर्कमधून शक्य होईल. यासाठी पेट्रोलियम मंत्र्यांनी जातिनिशी लक्ष देऊन कोकणच्या पाठीशी ठाम उभे रहावे, अशी मागणी श्री प्रमोद जठार यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री ना.धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.
यातून मुख्यतः कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवरची कर्जबाजारी होण्याची वेळ थोडीफार तरी टळेल व कोकणलाही या कंपन्यांची आत्मीयता नक्की जाणवेल, असा आशावाद श्री प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com