कोरोनासंकट काळात रत्नागिरी भाजपा रचनात्मक मदत कार्यात अग्रेसर

रत्नागिरी, ता. 24 ः कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्या दिवसापासून दक्षिण रत्नागिरी भाजपच्या 5 मंडलांमध्ये जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 500 हून अधिक कार्यकर्ते, आजी, माजी पदाधिकारी सेवाकार्यात अग्रेसर आहेत. एकही लोकप्रतिनिधी नसताना फारशी राजकीय ताकद नसताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लक्षणीय काम केले आहे. 33 हजार लोकांपर्यंत या कठीण काळात पोहोचण्याचे आव्हानात्मक काम केले आहे.
महिनाभर कोरोनामुळे सर्व जग लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा स्थितीत अनेक नागरिकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. नागरिक अन्नाशिवाय राहू नयेत म्हणून प्रशासनाबरोबर अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, समूह काम करत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष पुढाकार घेऊन काम करत आहे. रा. स्व. संघाच्या मुशीतून आलेले कार्यकर्ते सेवाकार्यात अग्रेसर झालेले रत्नागिरीमध्ये पाहायला मिळत आहेत.

राजकीय पिछाडीवरून सेवाकार्यात आघाडी
भाजपा हा केडर बेस पक्ष म्हटला जातो. मात्र रत्नागिरी राजकीय क्षितिजावर भाजपा पिछाडीवर होता. गेली 15 वर्ष आमदारकीने हुलकावणी दिली. खासदारकीही युतीच्या राजकारणात भाजपापासून दुरावली. जिल्हा परिषदमध्येही पदरी अपयश आले. देवरुख नगरपंचायत वगळता एकही विजय भाजपाने पाहिला नाही. असे असूनही भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आज मदत आणि सेवाकार्यात भाग घेताना दिसत आहेत. दक्षिण रत्नागिरीमधील 5 मंडळामध्ये तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पाचशेहून अधिक कार्यकर्ते सक्रीयपणे काम करत आहेत.

निधी उभारून मदतकार्य

भाजपाचे रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत 33 हजार गरजूपर्यंत शिधा आणि मास्कवाटप केले. बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्याला जागृत करत सक्रीय करण्यात अ‍ॅड. पटवर्धन यशस्वी होत आहेत, हे स्पष्टपणे जाणवत आहे. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आणि त्या त्या ठिकाणी निधी उभारत भाजपाने जीवनावश्यक वस्तूचे शिधा पॅकेज तयार करून गरजूपर्यंत ते पोहोचवले. या सर्वांची नोंदही ठेवण्यात आली. अ‍ॅड. पटवर्धन यांच्यासारखा विश्वासार्ह चेहरा लाभल्याने निधी संकलन होत आहे. आता प्रदेश भाजपानेही आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे भाजपा रत्नागिरीमध्ये सक्रियता दिसत आहे. पण राजकारण करताना दाखवलेली सेवाभावी कृती भाजपा रत्नागिरीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा गुणविशेष ठरणार हे नक्की

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button