
मिर्या, शिरगाव, निवळीसह एकूण ३७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १२३ कोटी ३० लाखांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
रत्नागिरी शहराजवळील गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिर्या, शिरगाव, निवळीसह एकूण ३७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १२३ कोटी ३० लाखांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. योजनेच्या कामाने घेतलेल्या गतीला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक मिळाला. या योजनेतून एकूण ३४ टाक्यांची उभारणी होणार असुन त्यातील काही टाक्यांसाठी अजूनही जागेचा प्रश्न उभा ठाकला आहे. जागांची अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली होती. १२३ कोटी ३० लाख रुपयांची ही नळपाणी योजना आहे. त्यासाठी तालुक्यातील वळके मराठवाडी व साठरे ठोंबरेवाडी येथे कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरालगतच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडे काम दिले आहे. या योजनेमुळे शहरानजिकच्या ३७ गावांमध्ये उन्हाळ्यात येणार्या कमी-जास्त पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. दररोज माणशी ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मिर्या, शिरगाव, नाचणे, खेडशी, कारवांचीवाडी, हातखंबा ते निवळी तिठ्यापर्यंतच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या गावांचा समावेश यात करण्यात आला आहे. मागील काही वर्षात साळवी स्टॉप ते निवळी तिठापर्यंत शहरीकरण वाढत असून लोकवस्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी विशेष लक्ष दिले आहे. www.konkantoday.com