
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत ७ मेडिकल्स कचाट्यात
औषध विक्री आणि साठवणुकीच्या नियमांची पायमल्ली करणार्या मेडिकल दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कारवाई केली आहे. गेल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्हाभरात केलेल्या वेळोवेळी तपासणीत तब्बल ५ मेडिकलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर दोघांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियम तोडणार्या मेडिकल दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
ग्राहकांच्या जीवाश खेळणार्या काही मेडिकल दुकानांमध्ये अन्न व औषध प्रशासनाला अनेक गंभीर त्रुटी आढळून येत असतात. यावर प्रशासनामार्फत निगराणी ठेवली जात असते. त्यासाठी वेळोवेळी भरारी पथकामार्फत मेडिकल्सना भेटी देवून तपासणी केली जाते. रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन कार्यालय प्रमुख व औषध निरीक्षक शशिकांत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यांत २५ मेडिकल्सची तपासणी करण्यात आली.
त्या दुकानांपैकी काही ठिकाणी विक्री केलेल्या औषधांची बिले ठेवलेली नव्हती तर काही ठिकाणी डेटा अद्ययावत केलेला नव्हता. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, औषध विक्री करताना आवश्यक असलेला फार्मसिस्टच दुकानात उपलब्ध नव्हता. भविष्यातही अशाच प्रकारे या प्रशासनामार्फत तपासण्या सुरूच राहतील, असा इशारा दिला आहे. सर्व औषध विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात ओ आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील औषध विक्री व्यवसायात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




