
पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला पदाचा राजीनामा
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवल्याचे समजते. विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार उदय सामंत यांनी ४१ हजारांचे मताधिक्य घेऊन ही निवडणूक जिंकली.
यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने पराभवाची नैतिक जबाबदारी रत्नागिरी विधानसभेतील एक पदाधिकारी म्हणून स्वीकारत असल्याचे सांगत आपल्याला पदमुक्त करावे, असे वरिष्ठांना कळवल्याचे समजते. पदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ‘मातोश्री’शी कायम एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे.




