
संगमेश्वर तालुक्यातील जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण
संगमेश्वर तालुक्यात लम्पी रोगाची लागण पशूंना होऊ नये, यासाठी लसीकरण सुरू आहे. आजवर 3 हजार गाय वर्गाच्या जनावरांना लसीकरण केले आहे. अजूनही 27 हजार पशूंचे लसीकरण बाकी आहे. लम्पी या रोगाने अनेक जनावरे देशात दगावली आहेत. याची लागण तालुक्यात येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात या रोगाचा एकही पशू तालुक्यात मिळून आलेला नाही. तरीही लसीकरण मोहीम खेडोपाडी सुरु करण्यात आली आहे. तालुक्यात पशुधन विभागात कर्मचारी यांची कमतरता असल्याने कंत्राटी कर्मचारी यांना घेऊन लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात 34 हजार पशु आहेत. यातील गाय वर्गातील 30 हजार जनावरे असून त्यांचे लसीकरण सुरू आहे. तीन महिन्यावरील गाय व बैल, पाडी, पाडा यांचे लसीकरण सुरु आहे. 3 हजार लसीकरण तालुक्यात पूर्ण झाले आहे. मनुष्यबळ कमी व तालुका विस्तीर्ण असल्याने मोहिमेला कालावधी लागत आहे. यातही जनावरे बहुतांश ठिकाणी चरायला पाठवलेली असतात.यात मोहिमेला कालावधी लागत आहे. शेतकरी यांनी या रोगाची लागण येऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामध्ये गोठ्यांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. गोचीड व गोमाशांच्या निर्मुलनासाठी औषध फवारणी करावी. हा रोग गायवर्गीय पशूंना होतो. लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे आवाहन प्रभारी पशुधन अधिकारी डॉ. पी डी. पोवार यांनी केले आहे.