
शशिकांत नाचणेकर यांच्या निधनाने करेल गाव शोकाकुल
| राजापूर
करेल ग्रामविकास मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते, समाजहितासाठी नेहमी तत्पर असणारे, मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे कै.श्री. शशिकांत गणपत नाचणेकर (वय 54 वर्षे) यांचे दि. 30/09/2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने नाचणेकर परिवारासह संपूर्ण करेल गाव शोकाकुल झाले आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य सदैव लक्षात राहील. कुठलेही सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा ग्रामविकासाची जबाबदारी असो – शशिकांतभाऊ नेहमी अग्रेसर असत. त्यांचा उत्साही सहभाग, लोकांना एकत्र जोडण्याची ताकद आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा त्यांचा स्वभाव ही त्यांची खरी ओळख होती.
ते फक्त मंडळाचे कार्यकर्ते नव्हते तर प्रत्येक घरचे आधारस्तंभ होते. गावातील कोणतेही काम त्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण झालेले नाही. “समाजासाठी जगणे हेच खरे जीवन” हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणत्याही प्रकारे भरून निघणारी नाही. आज संपूर्ण गावात एक मोठा आधार हरपल्याची भावना संपूर्ण पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे.




