
22 ते 24 जानेवारी 2022 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित पंधरावा संगीत महोत्सव
आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित पंधरावा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक 22 ते 24 जानेवारी 2022 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार असून यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिनिमित्त हा महोत्सव “स्वरभास्कर संगीत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रामधला मानाचा तुरा असणार्या या महोत्सवामध्ये पंडित आनंद भाटे, पंडित राम देशपांडे, बासरीवादक प्रवीण गोडखिंडी, व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर, सितारवादक मेहताब अलि नियाझी, गायिका दिपिका भागवत, ऋतुजा लाड यांसारखे दिग्गज आणि तरूण कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कलाकारांसोबत साथसंगतीला अजय जोगळेकर (संवादिनी), यशवंत वैष्णव, मयंक बेडेकर, सिद्धार्थ पडियार (तबला) यांचे वादनही असणार आहे. त्याचसोबत 30 जानेवारी 2022 रोजी पंडित भीमसेन जोशींना मानवंदना देण्यासाठी शास्त्रीय संगीतामध्ये होणारी स्वरभास्कर बैठक हीदेखील महोत्सवाचाच एक भाग असणार आहे.
गेली चौदा वर्षे अखंड सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे कोकणामधील संगीत रसिकांसाठी एक मेजवानी असते. थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये भरणारा संगीत महोत्सव यावर्षी अधिकच खास असणार आहे, 4 फेब्रुवारी 2021 ते 4 फेब्रुवारी 2022 हे वर्ष पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, 24 जानेवारी रोजी त्यांचा स्मृतिदिन आहे. याचेच औचित्य साधून यावर्षीचा पंधरावा संगीत महोत्सव हा “स्वरभास्कर संगीत महोत्सव” साजरा होणार आहे. या दिवशी पंडितजींचे खास शिष्य असणारे आनंद भाटे पंडितजींना स्वरांजली देणार आहेत.
महोत्सवाची सुरुवात 22 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता दिपिका भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सहगायनाने होईल. त्यांना संवादिनीवर साथ हर्षल काटदरे यांची असेल, तर तबला साथ सिद्धार्थ पडियार करतील. त्यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी आणि त्यांचे पुत्र व शिष्य षडज गोडखिंडी यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबलासाथ यशवंत वैष्णव करतील.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 23 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता यज्ञेश रायकर आणि मेहताब अली नियाझी यांची व्हायोलिन व सतार अशी जुगलबंदी सादर होईल. त्यांना तबलासाथ मयंक बेडेकर करतील. यानंतर सुप्रसिद्ध गायक पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे यांचे गायन सादर होईल. त्यांना संवादिनी साथ अजय जोगळेकर व तबला साथ यशवंत वैष्णव करतील.
महोत्सवाच्या तिसर्या दिवशी 24 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता पंडीत भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे अग्रणी गायक आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. त्यांच्या साथीला तबल्यावर भरत कामत आणि संवादिनी साथीला सुयोग कुंडलकर असणार आहेत. या तीनही दिवसांसाठी तिकीटविक्री ही थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. तसेच, आर्ट सर्कल रत्नागिरी तर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी मेम्बरशिप योजना 2022 सालासाठी सुरू करण्यात आलेली असून त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आर्ट सर्कलशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन दिवसांच्या या स्वरभास्कर संगीत महोत्सवानंतर 30 जानेवारी 2022 रोजी रत्नागिरी येथे विविध शास्त्रीय संगीत कलाकारांकडून पंडित भीमसेन जोशी यांना मानवंदना म्हणून “स्वरभास्कर संगीत बैठक” आयोजित करण्यात आलेली आहे. याचे तपशील लवकरच जाहीर करण्यात येतील.