चालकांनी व वाहकांनी चक्काजाम आंदोलन केल्याने रत्नागिरी शहरातील शहर वाहतूक ठप्प, विद्यार्थी व प्रवाशांना फटका
दोन दिवसांपूर्वी मजगांव येथे झालेल्या अपघात प्रकरणी चालक आणि वाहकांवर दाखल केलेला एफआयआर बदलल्याच्या निषेधार्थ व या दोघांना प्रशासनाने निलंबित केल्याप्रकरणी शहर वाहतुकीतील ६० चालक व वाहकांनी अचानक चक्काजाम आंदोलन सुरू केले. त्यामुळे रत्नागिरी शहरातील शहर वाहतूक पूर्णपणे कोलमडली. दुपारपासून ही वाहतूक बंद झाली ती सायंकाळपर्यंत एस.टी.च्या अनेक फेर्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षेचे विद्यार्थी, प्रवासी, कर्मचारी असे अनेकजण बसेस सुटत नसल्यामुळे एसटी स्टँडवर अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांत नाराजी पसरल्यामुळे एसटीच्या अधिकार्यांनी धाव घेतली. तेथे समजूत घालून त्यांनी बाहेरून येणार्या गाड्यांचा वापर करून काही मार्गावरील वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र शहर वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा फटका शेवटी जनतेला बसला.
सध्या शहरातून बस वाहतूक करणार्या अनेक गाड्या नादुरूस्त स्थितीत आहेत. त्याही स्थितीत चालकांना या गाड्या चालवाव्या लागत आहेत. शहरातील अपुरे रस्ते व अतिक्रमणे यामुळे या मार्गावरून शहर बस वाहतूक करणे म्हणजे जोखमीचे काम राहिले असून त्यामुळे अनेकवेळा त्याचा फटका कर्मचार्यांना बसत असल्याने त्यांचीही नाराजी होती. ती या निमित्ताने उफ़ाळून आली.
www.konkantoday.com