अण्णा शिरगावकर स्मृतीदिनी मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळा


चिपळूण :: कोकण इतिहासाचे नामवंत संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती निराधार फौन्डेशनमध्ये ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम तर अण्णांचे दाभोळोत्तर वास्तव्य राहिलेल्या शिरगाव येथील कन्या सौ. नूतन रविंद्र लब्धे यांच्या निवासस्थानी प्रथम स्मृतिदिन संपन्न झाला. यावेळी अण्णांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या पत्नी कै. सौ. नंदिनी अनंत शिरगावकर यांच्यासह अण्णांवर तयार करण्यात आलेली ‘स्मरणयात्रा’ ही स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.

अण्णांच्या स्मृति जागवताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष गंगाराम इदाते म्हणाले, ‘गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यामंदिर कोळथरे उभारणाऱ्या स्वर्गीय कृष्णामामा महाजन यांच्या स्मृति जीवंत ठेवण्यासाठी कोळथरे येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांप्रमाणे अण्णांचे काम सतत सर्वांसमोर असावे यासाठी ‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. कोळी आणि गरजू-गरीब विद्यार्थांना शिक्षण घेता यावे यासाठी अण्णांनी केलेल्या शैक्षणिक कामाचा आढावा दादा खातू यांनी मांडला. खेर्डी वाचनालय खेर्डीचे प्रतिनिधी आणि आंबडस शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक निर्मळ, स्वर्गीय अण्णांची पुस्तके वाचनालयाला भेट मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत अण्णांचा सहभाग राहिला. अण्णांनी गरजू मुलींसाठी वसतिगृहे काढली होती असेही निर्मळ म्हणाले. रविंद्र लब्धे यांनी अण्णांच्या जीवनपरिचयाचे वाचन केले. यावेळी ‘स्मरणयात्रा’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर, विलास महाडिक, समीर कोवळे, महम्मद झारे, कैसर देसाई, आरती फाउंडेशनच्या अनिता नारकर, प्रियांका कारेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. नूतन रविंद्र लब्धे यांनी तर संयोजन आणि सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रकाशबापू काणे यांनी केले. आभार केवल लब्धे यांनी मानले.

मालघर येथे ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम संपन्न

स्वर्गीय अण्णांचे मृत्युपूर्व काही दिवसांचे वास्तव्य राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती सेवा फाऊंडेशनच्या दुसऱ्या शाखेत स्मृतिगंध कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेसमोर प्रसिद्ध व्यावसायिक आणि माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांनी दीपप्रज्ज्वलन केले. लेखक आणि अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाटेकर यांनी अण्णांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेतला. ‘प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं ऑडीट करायला हवे आहे. मला, तुमच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचंय. असं ऑडीट करायला मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही ते वेळीच करा. कारण या ऑडीट दरम्यान काही त्रुटी लक्षात आल्यास त्या पूर्ण करण्यास अवधी मिळायला हवा.’ असं आपल्याला एकदा अण्णांनी सांगितल्याची हृद्य आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांनी सांगितली. श्रीकांत बापट यांनी बोलताना, आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसात मालघरला येऊन अण्णांनी जणू ‘वानप्रस्थाश्रम’ जगल्याची भावना व्यक्त केली. दादा कारेकर यांनी नाणीसंग्रह करण्याच्या दृष्टीने अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनाची आठवण सांगितली. यावेळी ‘दलितमित्र’ शिलभद्र जाधव, विलास महाडिक, अलताफभाई, सचीन शेट्ये, गणेश भालेकर, प्रशांत साठे, नामजोशी, सुरेश आवटे आदी अण्णांचा परिसस्पर्श लाभलेली व्यक्तीमत्त्वे उपस्थित होती. प्रियांका कारेकर यांनी सूत्रसंचालन तर आरती फाउंडेशनच्या संस्थापक अनिता नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button