भाजपच्या तालुका, जिल्हा कार्यकारिणीत ताज्या दमाचे कार्यकर्ते–भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप अधिक सक्षमपणे उभा करणार आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य दिले जाणार आहे. वेगवेगळ्या रणनितीच्या माध्यमातून भाजप अग्रेसर प्रयत्न करू. पुढील 8 दिवसांत सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येतील. यामध्ये नव्या रक्ताच्या आणि ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा विचार आहे. मात्र समाजातील सर्व थरांतील कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली. आज पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी सांगितले, भाजपच्या कार्यकारिणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांना यात संधी दिली जाणार आहे. लवकरच त्याची घोषणा करू. भाजपची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी नवा कार्यक्रमही देणार आहे. कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचावे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम केले पाहिजे. याकरिता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे.
भाजपची मूळ ध्येयधोरणे, भाजपचा इतिहास व वर्तमानकाळ, आजचे नेतृत्व यासंदर्भाने सर्व कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कार्यक्रम, निर्णय याबाबत सर्व कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध करून त्याबाबत सजग करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन म्हणाले.
www.konkantoday.com