
लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल
-उद्योगमंत्री सुभाष देसाई
संवादातून सर्व वाद सुटू शकतात याच भूमिकेतून शासन आपली भूमिका बजावेल. आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संवादासाठी पुढाकार घेतल्यावर विस्तारीत लोटे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटेल अशी खात्री आहे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे म्हटले.
लोटे परशुराम औद्योगिक संघटनेतर्फे आयोजित कोकण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमास एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अनबलगन, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन तसेच डॉ. सतिश वाघ आणि सोनजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी.
औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे. सोबतच औद्योगिक सुरक्षेकडे सर्वांना लक्ष द्यावे व योग्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल याचीही जबाबदारी उद्योगांनी घ्यावी.
गेल्या पाच वर्षात उद्योगांसमोरील अडचणी दूर करताना लागणाऱ्या परवान्यांची संख्या आम्ही 21 पर्यंत आणली आहे. उद्योजक सर्वच बाबतीत उत्तमपणे काम करीत असतील तर याला शून्यापर्यंत नेण्यासही आपण तयार आहोत असे ते म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात उद्योजकांसह समोर असणाऱ्या समस्या मांडल्या. डॉ. सतिश वाघ यांनी आपल्या मनोगतामध्ये आता भारतात उद्योगाच्या संधी खुल्या झाल्या आहेत. चीनमधील समस्या आणि कोरोना व्हायरसचा प्रकार घडला त्यामुळे या संधी निर्माण झाल्या आहेत असे सांगितले.
कोकणातील उद्योजकांना विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत वीज महाग मिळते इतर राज्यांच्या तुलनेत ही वीज महाग आहे. वीज स्वस्तामध्ये उपलब्ध करुन द्यावी. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला उद्योग आणायचे आहेत याची आम्हाला कल्पना आहे. पण तरीही विस्तारीत लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील 650 हेक्टर जमिनीत मध्ये नॉन केमिकल प्रकल्प आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा अत्यंत कटकटीचा वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला इन्व्हरमेटर क्लिअरन्स घ्यावा. सीईटीपीच्या माध्यमातून ट्रीटमेंट केलेले पाणी दाभोळच्या खाडीत सोडले जाते त्या पाण्याच पाईपलाईन समुद्रापर्यंत न्यावी. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करावे अशा मागण्या उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केल्या.
यावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील ख्यातनाम संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजीव जांभेकर यांनी केले.
www.konkantoday.com