मुंबई-गोवा, मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट कामठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा; रत्नागिरी मनसेची मागणी.

रत्नागिरी : रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच जेएसडब्लू पोर्ट लिमिटेड या कंपनीच्या वाहनाकडून वारंवार होणारे अपघात याबाबत तातडीने उपाययोजना करून यास जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, की गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई- गोवा महामार्ग त्याच प्रमाणे सध्या सुरू असलेल्या मिऱ्या – नागपूर महामार्गाच्या ठेकेदारांकडून योग्य ती उपाययोजना केली जात नाही. तसेच मनमर्जी, बेपर्वाई कामगिरी मुळे रत्नागिरी तालुक्यातील व परिसरातील अनेक पादचारी, नागरिक हे हकनाक जीवास मुकले आहेत , त्याचबरोबर सध्या शासन आणखी काही नवीन महामार्गाच्या भू संपादनाच्या प्रक्रियेत देखील आहे, परंतु येथील नागरिकांच्या जीवास धोका उद्भवणार असेल तर असा विकास मनसे पक्षाला मान्य नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथल्या विकासात्मक कामाला विरोध नाही; परंतु येथील सर्वसामान्य नागरिकांना या विकासाच्या नावाखाली जीवीतास मुकावे लागत असेल तर मनसे आपल्या पद्धतीने याविरोधात संघर्ष करण्यास तयार आहे. अलीकडील काळात अनेक अपघात या महामार्गाच्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर, रवी इन्फ्रा लिमिटेड यासारख्या अनेक ठेकेदारांच्या बेपर्वा कामकाजामुळे घडले आहेत..तसेच जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड या कंपनीसाठी काम करणाऱ्या अवजड वाहनांकडून निवळी गणपतीपुळे राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत असून संबंधित पीडित व्यक्तींना वा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देखील देण्यात आलेली नाही. याचा मनसेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

दरम्यान,या ठेकेदार कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात हे सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यास पात्र ठरावेत अशी स्पष्ट व आग्रही मागणी मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांनी यावर संबंधितांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.याप्रसंगी निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष सोमनाथ पिलणकर, सागर मयेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button