कलांगण ही कलाक्षेत्रातील एक चळवळ बनावी -अमोल लोध
संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे . याच्याच जोडीला येथील सांस्कृतिक पार्श्वभूमीला चांगली जोड मिळावी आणि ग्रामीण भागातील विविध कलांची अंग असणाऱ्या गुणी कलाकारांना एक व्यासपीठ देण्याच्या प्रामाणिक हेतूने स्थापन झालेल्या ' कलांगण ' या संस्थेच्या रोपट्याच्या केवळ वटवृक्ष नव्हे तर , ही कलाक्षेत्रातील एक मोठी चळवळ बनावी असे प्रतिपादन उद्योजक आणि कलाप्रेमी अमोल लोध यांनी केले . कला क्षेत्राशी निगडित असणाऱ्या निबंध कानिटकर , किरण पाध्ये , श्रीनिवास पेंडसे , डॉ . जयश्री जोग , अमोल लोध या मंडळींच्या मनात संगमेश्वर परिसरात एक कला चळवळ उभी राहावी असे मनात घोळत होते . याविषयी चर्चा करत असतांना पहिलाच प्रयत्न म्हणून २१ जानेवारी रोजी ' कलांगण ' या नावाने एका सांस्कृतिक संस्थेची स्थापना करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील हॉटेल ड्राइव्ह इनच्या प्रांगणात एका संगीत मैफीलीचे आयोजन करुन कला चळवळीचा शुभारंभ करण्यात आला . चिपळूण येथील तरुण गायक विशारद गुरव याच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाला शेकडो श्रोत्यांची असलेली उपस्थिती हीच या चळवळीची खरी गरज अधोरेखित करुन गेली . संगमेश्वर येथील कर सल्लागार किरण पाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना आजच्या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक उपस्थिती लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . श्रोत्यांनी कलाकारांच्या कौतूकासाठी भविष्यातही असाच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली . प्रास्ताविकात निबंध कानिटकर यांनी ' कलांगण ' या व्यासपीठाची असणारी गरज अधोरेखित केली . रुची ते अभिरुची असा कलांगणचा प्रमुख हेतू असल्याचे सांगताना ग्रामीण भागातील अनेक कलाकार दडले आहेत , मात्र या कलाकारांना अपेक्षित व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांची कला भरारी घेऊ शकत नाही . कलेतील विविध क्षेत्राची आवड असणाऱ्या कलाकारांना आवश्यक ते पाठबळ देणे हा कलांगणचा खरा उद्देश असल्याचे कानिटकर यांनी नमूद केले . भावगीत आणि शास्त्रीय गायन मैफिलीचे निवेदन डॉ . जयश्री जोग यांनी केले . यावेळी तरुण गायक विशारद गुरव याची ओळख करुन देतांना त्याच्या गायन कलेतील विविध पैलूंची भरारी आणि थक्क करणारा प्रवास कथन केला . विशारद गुरव याच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि प्रसिध्द अभिनेते डॉ . भगवान नारकर , आशिष प्रभुदेसाई , अमोल लोध , प्रभाकर घाणेकर , उमेश लघाटे आदि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कलांगणचा शुभारंभ करण्यात आला . आपल्या ओघवत्या शैलीत निवेदन करत डॉ. जयश्री जोग यांनी या मैफिलीची रंगत वाढविली . विशारद गुरव याने उत्तोमोत्तम भावगीते , भक्तीगीते सादर करीत श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले . यावेळी विशारदला साथ देण्यासाठी ऑर्गन – सुमेध सावरकर , तबला – निखिल रानडे , पखवाज – किरण लिंगायत , संवादिनी – सुहास पाध्ये , तालवाद्य – विश्वनाथ दाबके यांची होती. यावेळी संगमेश्वर येथील पहिली तरुण संगीत विशारद निहाली गद्रे हिचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . विशेष म्हणजे उपस्थित कलाकार आणि मान्यवरांचे स्वागत झाडाचे रोपटे देवून करण्यात आले . कलांगणची पुढील संगीत मैफल १९ एप्रिल रोजी गोवा येथील प्रसिध्द गायक अरविंद सरमोकादम यांच्या गायनाने संपन्न होणार असल्याचे निबंध कानिटकर यांनी जाहिर केले .
अभिनेते डॉ . भगवान नारकर – संगमेश्वर सारख्या ग्रामीण भागात विविध कलांचे एकत्रीकरण करुन या कलाकारांना आवश्यक व्यासपीठ आणि मार्गदर्शन देणे अत्यंत गरजेचे होते . अमोल लोध , निबंध कानिटकर , श्रीनिवास पेंडसे या कलाप्रेमी मंडळींनी ‘ कलांगण ‘ च्या माध्यमातून ही उणीव भरुन काढली हे निश्चितच अभिनंदनीय आणि कौतूकास्पद आहे . संगमेश्वर तालुक्यातील कलारसिकांनी कलांगणला बळ देण्यासाठी विविध अंगाने मदत करणे गरजेचे आहे. आपण स्वतः अभिनयाच्या बाबतीत आवश्यक असेल ते सर्व सहकार्य नवोदित अभिनेत्यांना कलांगणच्या माध्यमातून देण्यास तयार आहोत . विशारद गुरव यांच्या संगीत मैफीलीने सुरुवात झालेले कलांगण या संस्थेचे अंगण श्रोत्यांच्या उपस्थितीने ओसंडून जाईल याची आपल्याला खात्री आहे .