पालपेणेत बेदरकारपणे दगडांची वाहतूक करणारे सहा डंपर ग्रामस्थांनी अडवले

गुहागर : पालपेणेवासीयांनी शुक्रवारी नियम धाब्यावर बसवून, बेदरकारपणे दगडांची वाहतूक करणारे सहा डंपर अडवले. सर्व डंपरचे व्हिडिओ शुटींग करून पुरावे गोळा केले. ग्रामपंचायतीने याची तक्रार जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे, वरवेली आणि मळण या गावांच्या सीमांवर असलेल्या स्टोन क्रशरमध्ये जेटीच्या कामासाठी आवश्यक अवाढव्य दगडांचे उत्खनन केले जाते. या दगडांची वाहतूक पाटपन्हाळे, शृंगारतळी मार्ग अंजनवेल येथील कंपनीपर्यंत होते. जितक्या जास्त फेर्‍या तितके जास्त भाडे मिळत असल्याने मोकळा रस्ता मिळाला की 8 ते 10  डंपर एकामागे एक भरधाव वेगाने जातात.
डंपर चालकांच्या अशा बेफाम वागणुकीमुळे शुक्रवारी पालपेणेतील ग्रामस्थांनी ठरवून डंपर रोखले. त्यावेळी डंपरच्या मागे वाहन क्रमांक नसल्याचे समोर आले. डंपरच्या हौद्यांचे फाळके कमी उंचीचे होते. तरीही फाळक्याच्या उंचीपेक्षा जास्त दगड हौद्यात भरलेले होते. दगडांवर कोणतेही आच्छादन नव्हते.त्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत पालपेणे यांच्याकडे रितसर तक्रार केली. या तक्रारीनंतर पालपेणेचे उपसरपंच रघुनाथ घाणेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसह अडवलेल्या डंपरची पाहणी केली आणि तक्रार केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button