कोकण विद्यापीठाविषयी निर्णय करतांना कोकणातील सर्वसामान्य
विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक यांच्या हिताच्या दृष्टीने विचारमंथन आवश्यक !
ऍड. सौ. सुमिता धनंजय भावे
कोकण विद्यापीठाविषयी निर्णय करतांना कोकणातील सर्वसामान्य
विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक यांच्या हिताच्या दृष्टीने विचारमंथन आवश्यक !
ऍड. सौ. सुमिता धनंजय भावे रत्नागिरी (९४२२४३०२६०)
कोकण विद्यापीठाच्या स्थापनेच्या मागणीने अलिकडेच पुन्हा डोके वर काढले आहे. लोकप्रतिनिधी आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांनी तातडीने लक्ष घालून उपसचीव समिती नेमण्याचा निर्णय घेऊनही टाकला आहे. या गठीत समितीमध्ये कोणत्याही विद्यार्थी संघटनेचा कोणीही प्रतिनिधी दिसून येत नाही. आपले रत्नागिरीचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत हे तरूणांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. कोकण विद्यापीठाच्या स्थापनेविषयी त्यांच्या मनामध्ये काय आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण भागामधून महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे तरूण आणि आगामी कालावधीमध्ये पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचे कोणतेही नुकसान उदयजी सामंत होऊ देणार नाहीत अशी खात्री आहे यामुळेच त्यांच्यासमोर हे विचार मांडणे आवश्यक आहे असे वाटते.
फेब्रुवारी २०१८ मध्ये स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीसाठी चिपळूण येथे सर्व समावेशक सभा डी.बी.जे. महाविद्यालयात संपन्न झाली होती. यामध्ये नेते. शिक्षण संस्था चालक, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी आमदार इत्यादींनी उपस्थिती लावली होती. सर्वांनी कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे असा आग्रही ठराव संमत ही केला..
त्यानंतर काही लोकप्रतिनिधीही या मागणीसाठी विधी मंडळात सरसावले. शिक्षणमंत्री मा. विनोद्जी तावडे यांनी त्याबाबत समर्पक उत्तरही दिले. मा. शिक्षणमंत्री महोदयांनी कोकण विद्यापीठाच्या मागणीचा विचार करतांना विद्यार्थ्यांच्या मतांचा विचार करणे आवश्यक आहे असेही उत्तरात सांगितले. हाच मुद्दा विचारात घेणे अत्यंत महत्वाचे आहे असे मी वरील सर्व समावेशक सभेच्या वेळी लेख लिहून विचार व्यक्त केले होते. त्यानंतर हा विषय आपोआपच संपला होता. परंतु आता मंत्रीमहोदयांनीच कोकण विद्यापीठाच्या बाबत सचिव पातळीवर समिती नेमण्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने मला माझे विचार नव्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे पालक यांचेसमोर ठेवावेत आणि नंतर कोकण विद्यापीठाच्या मागणीचा विचार करावा म्हणून या लेखाचा पुन्हा प्रपंच!
याचे महत्वाचे कारण की या विषयाच्या चर्चेत कुठेही कोणतीही विद्यार्थी संघटना, पालक यांची प्रतिक्रिया नाही. विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या भविष्याची चिंता करणार्या पालकांकडून स्वतंत्र कोकण विद्यापीठ हवे आहे का याविषयावर सखोल विचार मंथन होणे गरजेचे आहे असे प्रामाणिकपणे वाटते. आश्चर्य म्हणजे कोकण विद्यापीठाच्या मागणी बाबत कोणत्याच विद्यार्थी संघटनेचे मत आजतागायतही कोणत्याही शिक्षण संस्थेनेही घेतलेले नाही. आणि अशा परिस्थितीत कोकण विद्यापीठाची मागणी थोडीशी विसंगत वाटते. कोकणात समाविष्ट असलेल्या ठाणेवासियांना, रायग़डवासियांना कोंकण विद्यापीठ चालणार आहे का आणि सिंधुदुर्गवासियांनाही कोकण विद्यापीठाची पदवी चालणार आहे का याचा शोध कोणी घेतला आहे का?
काही वर्षापूर्वीच आमच्या विद्यार्थी दशेत रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाला संलग्न करावा या मागणीसाठी विद्यार्थी परिषद या तत्कालीन कार्यरत विद्यार्थी संघटनेमार्फत बरीच आंदोलने करण्यात आली. असे म्हणतात की त्यावेळी कोकणातील संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या शिवाजी विद्यापीठाला काहीच भवितव्य नव्हते. शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधरांनी नोकरीसाठी अर्जही करू नये इतक्या टोकाची भूमिका उद्योग व्यवसायामध्ये घेतली जात असे अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली होती.
कोकणचे मुंबईशी असलेले जवळचे संबंध, नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये जाणारा कोकणी माणूस याचा विचार करूनच कोकण विभाग मुंबई विद्यापीठाला जोडावा या मागणीने जोर धरला आणि अनेक आंदोलनानंतर आपल्या विभागातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली. सुमारे चाळीस वर्षापूर्वी या संबंधातील विद्यार्थी आणि विचारवंताच्या भावना लक्षात घेऊनच कोकणातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली हे लक्षात घेणे जरुरीचे वाटते. त्यामुळे सन १९७५-७६ पासून कोकणातील विद्यार्थाला मुंबई विद्यापीठाची पदवी मिळू लागली.त्यानंतर वेळोवेळी कोकणातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही मुंबई विद्यापीठामध्ये मानाचे स्थान, गुणात्मक उच्च स्थान मिळविलेले आहे. कोकणातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कोठेही कमी पडलेला नाही हे आपल्याकडील विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनीही दाखवून दिलेले आहे. इतकेच नव्हे तर प्राध्यापकांनीही आपली गुणवत्ता आणि अध्यापनातील कौशल्य सिद्ध केलेले आहे. आज लहानात लहान गावातील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधून येऊन जाऊन मुंबई विद्यापीठाची पदवी घेतात आणि स्पर्धेच्या जगात अनेक प्रकारे स्वत:ला सिद्ध करतात. अत्यंत गरीब परिस्थितीमधील मुलांना थोड्या खर्चामध्ये मुंबई सारख्या उच्च विद्यापीठाची पदवी आपल्या गावात राहून जवळच्याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन मिळवता येते. अशा परिस्थितीमध्ये मुंबई विद्यापीठाचा पदवीधर असणे विद्यार्थांना अधिक आवडेल का कोकण विद्यापीठाचा पदवीधर असे म्हणवून घेणे आवडेल हा खरा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांसमोर असणे आवश्यक आहे आणि असण्यापेक्षा पालक आणि विद्यार्थी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ते हिताचे असेल का हा महत्वाचा प्रश्न आहे. कोकण विभाग म्हटले म्हणजे त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश होतो. ठाणे, रायगडवाले कोकण विद्यापीठाला संमती देतील असे वाटत नाही कारण त्यांना मुंबई विद्यापीठाची महती पूर्वीपासूनच माहिती आहे. राहता राहिले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विद्यार्थी ! परंतु असे दिसून येते की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील महाविद्यालये कोकण विद्यापीठाच्या मागणीमध्ये सहभागी असावेत असा आभास निर्माण करण्यात आला आहे. तथापि कोकण विद्यापीठाच्या मागणीचा त्यांनी खरोखरच गंभीरपणे विचार केला आहे का असा पश्न मनात उभा रहातो. मुंबई विद्यापीठाच्या केवळ व्यवस्थापनातील त्रुटीमुळे मुंबई विद्यापीठ नको असे म्हणणे सध्यातरी नक्कीच संयुक्तिक वाटत नाही. ती तात्कालिक प्रतिक्रिया असू शकते. भविष्यातील दूरगामी परिणामांचा विचार त्यामध्ये झालेला दिसून येत नाही.
मुंबई विद्यापीठच्या कारभाराचा विस्तार खूपच वाढला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येणार्या अडचणी दूर करण्याकरिता सुमारे वीस वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र (सब-सेंटर) रत्नागिरीमध्ये सुरु झाले. त्यानंतर आज रत्नागिरीच्या एम.आय.डी.सी. विभागामध्ये त्या करिता स्वतंत्र अद्ययावत अशी प्रशस्त नवीन इमारतही उभारण्यात आलेली आहे. आता प्रश्न उरतो तो विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचा. मुंबई विद्यापीठातील आस्थापनेचा कारभार एवढाच विषय जर कोकण विद्यापीठाच्या मागणीमागे असेल तर येथील उपकेंद्र अधिकाधिक कार्यक्षम करणे, त्या उपकेंद्रास काही प्रमाणात स्वायत्त अधिकार देणे किंबहुना कोकणातील महाविद्यालयांचे सर्व प्रश्न याच उपकेंद्रा मार्फत सोडविले जातील असे पाहणे यासाठी नेते, पुढारी, राजकीय नेते, शिक्षण तज्ञ वगैरेनी जोरदार प्रयत्न करणे खरे म्हणजे गरजेचे आहे. मात्र या पर्यायाकडे कोणीच लक्ष देण्यास आजही तयार नाहीत हे खरे दुर्दैव आहे. विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांनी अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा कशी होईल हे पाहण्याऐवजी स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा विचार करून आपण आपली वेगळी चूल मांडणे हा उपाय बरोबर ठरेल का याचा विचार करणे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हिताचेच होईल ! कारण पदवी बरोबरच विद्यापीठाचा दर्जा नक्कीच विचारात घेतला जातो हेही या निमित्ताने लक्षात घेणे आवश्यक आहे.
आज परदेशातील विद्यापीठे भारतामध्ये येण्याविषयी आपण वाचतो आहोत. म्हणजे येथील विद्यार्थी त्यामधून फॉरीन युनिव्हर्सिटीची डिग्री भविष्यकाळात घेऊ लागेल! आणि आपण मात्र-आमच्या पुरते आमचे-असा संकुचित विचार करणार काय? तसेच असाही थोडासा विचार करा सन १९९६ मध्ये स्थापन झालेल्या फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजमुळे आपल्या रत्नागिरी मधील अनेक गरीब, मध्यमवर्गीय मुले गेल्या काही वर्षात इंजिनिअर झाली आणि नोकरी उद्योगात चांगल्या प्रकारे स्थिरावली आहेत. यांची संख्या सुमारे ४००० चे आसपास आहे. याशिवाय आंबव येथील माने इंजिनिअरिंग, लोटे येथील घरडा इंजिनिअरिंग, यामधून इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. थोडक्यात आपल्या येथील सर्व सामान्य मुलांना इंजिनिअरिंगचे दालन खुले झाले आहे. इतकेच नव्हे तर केवळ मुंबई विद्यापीठाची पदवी मिळविण्यासाठी महाराष्ट्रामधूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून देखील विद्यार्थी वरील महाविद्यालयात प्रवेश घेत असतात ही वस्तुस्थिती आहे. कोकण विद्यापीठ करावयाचे म्हटले तर भिती अशी आहे की, अशा प्रकारचे मागणी असलेले अभ्यासक्रम कोकण विद्यापीठामध्ये चालविण्यात त्या त्या व्यवस्थापनाना तरी स्वारस्य असेल का ? आणि जर नसेल तर ही उच्च शिक्षणाची सुविधा आम्ही आपल्याच हाताने घालवून बसू कारण मुंबई विद्यापीठाची संलग्नता हाच त्याबाबत महत्वाचा आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा विषय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी पदवीनंतर परदेशात जाणारे विद्यार्थी आणि तेथे जॉब मिळविणारे विद्यार्थी आपल्या मुंबई विद्यापीठाला तेथे केवढी मोठी मान्यता आहे ते अभिमानाने सांगत असतात.
याविषयी आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले पालक मुला-मुलीना बाहेरगावी अन्य विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवू शकतात. सर्व सामान्य माणसाला ते शक्य नाही. म्हणूनच कोकण विद्यापीठाच्या निर्णयाचा थेट परिणाम मतदार संघातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावरच प्रामुख्याने होणार आहे याची नोंद लोकप्रतिनिधीनी घ्यायला नको का? कारण श्रीमंत घरातील विद्यार्थी आपले गाव, शहर सोडून मुंबई-पुण्याला शिक्षणासाठी सहजगत्या जाऊ शकतातमात्र आर्थिकदृष्ट्या हे न परवडणार्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी परवड याकडे लक्ष देणे किंबहुना अशी परवड केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने होणे या गोष्टींची दखल विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांच्या सारख्या तरूण नेतृत्वाने नक्कीच घ्यायला हवी ही गोर-गरीब पालकांची त्यांच्याकडून माफक अपेक्षा आहे आणि ती अयोग्य म्हणता येणार नाही. काही वर्षापूर्वी रत्नागिरीचे शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)येथून हलविण्याच्या निर्णयाला ना. सामंत यांनी केलेला विरोध आणि पॉलिटेक्निक रत्नागिरी मध्येच ठेवण्याच्या झालेल्या निर्णयामध्ये त्यांचा असलेला सहभाग आणि तळमळ लक्षात घेता ना. उदयजी सामंत हे आपल्या रत्नागिरी आणि बरोबरीनेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताचा विचार सर्वप्रथम प्राधान्याने करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच आहे.
म्हणून आजही असे सुचवावेसे वाटते की, कोकण विद्यापीठाची मागणी हा एक अत्यंत गंभीर परिणाम करणारा विषय आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीबाबत कोणताही अंतिम निर्णय घाई-गर्दीने घेण्यापूर्वी समाजातील सर्व स्तरातील विचारवंतांकडून या विषयाचे सार्वत्रिक विचार मंथन होणे आवश्यक वाटते. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोकण विद्यापीठाची मागणी करणे योग्य होणार नाही असे वाटते. विद्यार्थ्यांनी किवा त्यांच्या संघटनांनी आणि पालकांनीही आत्ताच याची दखल घेणे अत्यावश्यक आहे. ना. उदयजी सामंत याबाबतीत नक्कीच विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताचा विचार करूनच सुयोग्य असा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
ऍड.सौ. सुमिता धनंजय भावे,रत्नागिरी.(९४२२४३०२६०)