
कोंढेतड येथे पाण्याची बोंबाबोंब; ठेकेदाराला बिल अदा झाले पण पाणी मिळेना
राजापूर : शहरानजीकच्या कोंढेतड येथे घरोघरी पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. कुर्मगतीने काम आणि ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी यामुळे ही नळपाणी योजना गेल्या काही वर्षापासून वादामध्ये अडकलेली आहे.
याप्रकरणी कोंढेतडचे माजी उपसरंपच अरविंद लांजेकर, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र तुळसावडेकर यांनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुहास पंडित यांची भेट घेतली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढताना या नळपाणी योजनेचे संबंधित ठेकेदाराला बहुतांश बिल अदा होते, मग लोकांच्या घरामध्ये पाणी कधी येणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरानजीकच्या कोंढेतड येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी लाखो रूपयांचा निधीही मंजूर झालेला आहे. 2019 पासून सुरू असलेल्या या नळपाणी योजनेच्या कामाबाबत लोकांकडून यापूर्वी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही नळपाणी योजना चर्चेत राहिली आहे. या नळपाणी योजनेच्या कामावरून माजी उपसरपंच लांजेकर, तुळसावडेकर यांनी पुन्हा एकदा पंचायत समितीवर धडक दिली.
यावेळी गटविकास अधिकारी पंडित यांच्याशी चर्चा करताना नळपाणी योजनेद्वारे अद्यापही घरोघरी पाणी येत नसल्याकडे लक्ष वेधले. वारंवार तक्रार करूनही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने लोकांच्या घरोघरी अद्यापही पाणी आलेले नसल्याचे सांगितले.
याप्रकरणी प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर गटविकास अधिकारी पंडित यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. खोत, कनिष्ठ अभियंता श्री. मेस्त्री यांनी कोंढेतड गाडगीळवाडी येथे भेट देऊन घरोघरी पाणी येते की नाही याची पाहणी केली. यावेळी सरपंच मनाली तुळसावडेकर, माजी उपसरपंच लांजेकर, सुभाष नवाळे, तुळसावडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.