
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात सोडले दहा हजार क्युसेक पाणी; पूरस्थितीचा अभ्यास, समिती देणार शासनाला अहवाल
चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी धरणाचे तीन वक्र दरवाजे पुन्हा एकदा गुरूवारी चार फुटांनी उघडण्यात आले. याद्वारे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात दहा हजार क्युसेक पाणी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोडून चाचणी घेण्यात आली. याद्वारे पाण्याची पातळीही मोजण्यात आली. मोडक समिती अभ्यासगटाने केलेल्या सूचनेनुसार दुसर्यांदा कोळकेवाडी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. मोडक समिती अभ्यासगटाने केलेल्या सूचनेनुसार दुसर्यांदा कोळकेवाडी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. नद्यांची व बोलादवाडी नाल्याची पाणी पातळी तपासून अभ्यास गटाला हा अहवाल देण्यात येणार आहे. अलोरे, कोळकेवाडी, पेढांबे, नागावे आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. संचारबंदीही लावण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बोलादवाडी नाल्याची पाणी पातळी वाढली होती. त्याचप्रमाणे वाशिष्ठी नदीपात्रातील पाणी पातळी काहीअंशी वाढली. परंतु पात्र रूंद असल्याने नदीपात्रातूनच पाणी खाडीला जावून मिळाले. किनार्यालगतच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता श्री. पोतदार, उपअभियंता गायकवाड, श्री. साठे, मेंटेनन्स विभागाचे अभियंता साळुंखे आदी अधिकारी कोळकेवाडी धरणावर उपस्थित होते. प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी कोळकेवाडी धरण परिसराला भेट देत पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.