काँग्रेसला धक्का, संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी! भाजपात प्रवेश करणार; पक्ष सोडण्याची वेळ का आली? म्हणाले, “मला कायम…”

काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता संग्राम थोपटे हे देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्यावर काँग्रेस पक्षानेच काँग्रेस सोडण्याची वेळ आणली असल्याचंही म्हटलं आहे. तसेच आपल्याला अनेकदा डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी संग्राम थोपटे यांनी पक्षावर केला.

आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात. मात्र, प्रामाणिकपणे काम करत असतानाही पक्षाने तुम्हाला कायम डावलण्याचं काम केलं. शेवटी तुम्हाला मतदारसंघात जनतेनी तीन वेळा संधी दिली. मतदारसंघात तुम्ही विकासाची कामे केली. पण मतदारसंघात अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे”, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.

देशात किंवा राज्यात भाजपाचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मत आहे की आपल्या मतदारसंघात विकास कामांना जर गती द्यायची असेल तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आता माझी वैयक्तिक भूमिका मी आधीच सांगितलं होतं की कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ठरवेन. आता कार्यकर्त्यांचं मत आहे की मी भारतीय जनता पक्षाची राजकीय भूमिका घेतली पाहिजे. तेथेच आपल्याला न्याय मिळेल”, असंही संग्राम थोपटे यांनी म्हटलं.

येणाऱ्या २२ एप्रिल रोजी भाजपात पक्ष प्रवेश होईल. या पक्ष प्रवेशाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत”, अशी माहिती संग्राम थोपटे यांनी दिली.*‘काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली…’*“मला काँग्रेसकडून कुठेही थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही. खरं तर मला काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. २००९ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलो. पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. तेव्हा मी नवीन होतो. त्यानंतर २०१४ ला मी पुन्हा निवडून आलो. त्यानंतर २०१९ साली पुन्हा निवडून आलो. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा काँग्रेसला १२ मंत्रि‍पदे मिळाली होती.

मला संधी मिळेल अशी भावना होती. पण तेव्हा मला संधी मिळाली नाही”, असंही ते म्हणाले.“त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा मला वाटलं होतं की मला संधी मिळेल. पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तेव्हाही संधी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली आहे की पुण्यासारख्या जिल्ह्यात देखील तुम्ही तीनवेळा निवडून आलात तरी देखील तुम्हाला संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांशी झाली. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे”, असं संग्राम थोपटे यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button