कालिदास व्याख्यानमाला माझ्यासाठी टर्निंग पॉईंट- डॉ. निर्मला कुलकर्णी
ग्रहतार्यांचा अभ्यास करायचा होता पण गणित फारसे चांगले नसल्याने मी कला शाखा निवडली. सावंतवाडी येथे संस्कृत बंद झाल्याने रत्नागिरीत गो. जो. महाविद्यालयात आले. डॉ. भा. के. नेने यांचे दोन वर्षे मार्गदर्शन मिळाले व त्यावेळची कालिदास व्याख्यानमाला माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्यावेळी डॉ. स. अ. डांगे यांची व्याख्याने ऐकली. अनेक विषय आपल्याला संस्कृतमध्ये शिकता येतील याची खात्री पटली आणि वेदवाङ्मय व हस्तलिखित शास्त्राचा अभ्यास पुणे विद्यापीठात केला, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रगत संस्कृत अध्ययन केंद्राच्या प्रमुख डॉ. निर्मला कुलकर्णी यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनानंतर ‘चारित्रवर्धन कालिदास संहिता’ या विषयावर त्या बोलल्या. त्या म्हणाल्या की, कालिदासाच्या रघुवंशावर अनेक टीका लिहिल्या आहेत त्यातील हिंदू व जैन लेखकांनी लिहिल्या आहेत, चारित्रवर्धन हा जैन वाचनाचार्य होता. त्याने ही टीका साधारण 1172 मध्ये लिहिली असावी. एकूण सहा टीका लिहिल्या. हिंदू टीकाकार वल्लभदेव, मल्लिनाथ अरुणागिरी नाथ, नारायण पंडित, यांनी लिहिली व जैन मध्ये हेमाद्री, दिनकर, सुमतीविजय, चारित्रवर्धन हे आहेत.
कालिदासाचे महत्व सांगताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, बाणभट्ट, दंडी, राजशेखर, जयदेव यांनी कालिदासाची महती ग्रंथात लिहिली आहेच. पण परदेशातही कालिदासाच्या सौन्दर्यदृष्टीचा प्रसार, अधिक झाला. 1786 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी संस्कृत अभ्यास केला. त्यांनी संस्कृत, ग्रीक व लॅटिन यांचे मूळ एकच असावे असा शोधनिबंध लिहिला. मनुस्मृतीचे भाषांतर केले, शाकुंतल चे लॅटिन भाषांतर केले व ते मानववंश व वनस्पती शस्त्राचे संशोधक होस्टर यांना दिले. त्यांनी त्याचा जर्मन अनुवाद केला व नाटककार गटे यांनी नाटकात सूत्रधार व नटीची रचना केली.
प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार केला. उपप्राचार्य आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी डॉ. कुलकर्णी यांचा प्रास्ताविक केले. देताना डॉ. भा. के. नेने यांनी कालिदास व्याख्यानमाला सुरू केली. त्यांच्या या विद्यार्थिनी आहेत, व्याख्यानमालेचा सुवर्ण महोत्सव आणि हीरक महोत्सव साजरा झाला. एकेकाळी येथे विद्यार्थी श्रोता म्हणून बसणार्या डॉ. कुलकर्णी आज व्याख्यात्या आहेत. त्यांचा हस्तलिखित शास्त्र आणि वेद यांचा गाढा अभ्यास आहे. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.