
वरवडे येथील खाडीकिनारी अनधिकृत बांधकामे
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाचे नियम पायदळी तुडवत आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून ही बांधकामे करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महसूल व तलाठी कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वरवडे येथील पुलाच्या खालील भागात खाडीला लागूनच ही बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे गावात एका व्यक्तीने सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. खारलँड विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही बांधकामे करण्यात येत आहेत. या व्यक्तीने अनधिकृत बांधकाम सुरू केल्यानंतर इतर काहीजणांनी देखील या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची मालिकाच सुरू केली आहे. वरवडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून देखील या बांधकामांना अभय दिल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. या अनधिकृत बांधकामावर महसूल विभाग आणि तलाठी कार्यालय दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खारवीवाडा येथे किनारी बाजूला अशी बांधकामे सुरू राहिली तर काही दिवसांनी पाण्याचा ओघ बदलून पाणी भंडारवाडी येथील घरामध्ये शिरण्याचा धोका निर्माण होणार आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आताच या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.