रत्नागिरीत भाजपचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
रत्नागिरी-मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी दुसर्यांदा शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे वाजवून आनंद व्यक्त केला. भाजपच्या जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके वाजले. त्यानंतर साळवी स्टॉप, मारुती मंदिर आणि जयस्तंभ परिसरात फटाके फोडून व घोषणा देऊन जल्लोष केला. नंतर कार्यकर्ते शहरातील मुख्य रस्त्यांवरून चालत जाऊन पुन्हा भाजप जिल्हा कार्यालयात शक्तीप्रदर्शन केले. बर्याच दिवसांनंतर भाजपने मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आम्हीसुद्धा कमी नाही, मी पुन्हा आलोय हे दाखवून दिले.
भाजप-शिवसेनेने महायुती करून सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. राष्ट्रपती राजवटही लागू झाली. गेले महिनाभर सुरू असलेल्या चर्चांना विराम देत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली व उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. वाहिन्यांवर ही बातमी झळकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन तसेच तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.
शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. या वेळी राजेश सावंत, बिपीन शिवलकर, सचिन वहाळकर, प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, महेंद्र जैन, मंदार मयेकर, अॅड. विलास पाटणे, अॅड. बाबा परुळेकर, सीए श्रीरंग वैद्य, भाई जठार, प्रमोद रेडीज, महेंद्र मयेकर ऐश्वर्या जठार, राजश्री शिवलकर, नगरसेविका मानसी करमरकर, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.